साई रिसॉर्ट प्रकरण! नेमंक काय घडतंय; सर्वांचं लक्ष

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली परिसरात असलेले साई रिसॉर्ट प्रकरण चर्चेत आहे. त्यामुळे या प्रकरणात आता नेमंक काय घडतं? याकडे सर्वांचेच लक्ष आहे. त्यातच आता एकीकडे दापोली येथील साई रिसॉर्ट पाडण्याचे आदेश अनिल परब यांना सत्र न्यायालयाने दिले आहेत. तर दुसरीकडे खिचडी घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना ईडीने समन्स बजावलायं.तसेच रवींद्र वायकरांवर ही ईडीने गुन्हा दाखल केलाय. त्यामुळे या तिन्ही घटनांचा वेध घेत आज आपण साई रिसॉर्ट प्रकरण, खिचडी घोटाळा, पंचतारींकित हॉटेल घोटाळा याबद्दल आणि त्यात आतापर्यत काय घडले. या प्रकरणातील आरोपी कोण आहेत? या विषयी जाणून घेणार आहेत.

मुळात दापोली परिसरातील साई रिसॉर्ट हा बेकायदेशीरपणे बांधण्यात आल्याचे आणि त्यात घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांनी काही दिवसांपुर्वी केले होते. त्यानंतर या प्रकरणाच्या चर्चेला गती मिळाली. या प्रकरणात उबाठा गटाचे नेते अनिल परब यांनी त्यांचे भागीदार सदानंद कदम यांच्यासोबत बेकायदेशीरपणे रिसॉर्ट बांधल्याचा आरोप आहे. पण आता हा रिसॉर्ट पाडल्याचे आदेश सत्र न्यायालयाने दिल्याने परब यांना जोरदार धक्का बसलाय. मुळात मार्च 2022 मध्ये दापोली कोर्टात भारत सरकारने अनिल परब यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी याचिका करण्यात आली. कारण हा रिसॉर्ट ज्या जागेवर बांधण्यात आला आहे, ती जागा सरकारी मालकीची आहे.

त्यामुळेच भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने हा रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याने 31 जानेवारी 2022 रोजी हा रिसॉर्ट 90 दिवसांत तोडण्याचे आदेश दिले होते. हा रिसॉर्ट पाडण्याची जाहीरात वृत्तपत्रातही देण्यात आली होती. दरम्यान आता रिसॉर्ट पाडण्याचे आदेश देण्यात आल्यानंतर पुन्हा अनिल परब यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे संजय राऊतांनंतर साई रिसॉर्ट प्रकरणी तुरुंगवारी करण्याची वेळ अनिल परब यांच्यावर येईल, अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे.

दरम्यान दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर आणि त्यांच्या पत्नी मनीषा वायकर यांच्या विरोधात ईडीने गुन्हा दाखल केलाय. त्याच्यावर बेकायदेशीर हॉटेल बनवल्याच्या आरोपाप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जोगेश्वरी येथे पंचतारांकित हॉटेल बनवण्यासाठी वायकर यांनी पालिकेचा भूखंड हडप केल्याचा आरोप असून हा ५०० कोटींचा कथित घोटाळा असल्याचं म्हटलं जात आहे. या प्रकरणी वायकर यांना ईडीकडून चौकशीला बोलावलं जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. मुळात जुलै २०२१ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोगेश्वरी येथे लहान मुलांच्या खेळाच्या मैदानावर २ लाख स्केवअर फुटाचे ५०० कोटी रुपयांचे ५ स्टार हॉटेल बांधण्याची परवानगी रवींद्र वायकर यांना दिली होती. दरम्यान मातोश्री स्पोर्ट्स ट्रस्ट आणि सुप्रीमो बॅक्वेटच्या नावाने हा शेकडो कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप वायकर यांच्यावर लावण्यात आला. त्यामुळे रवींद्र वायकरांवर ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर आता उबाठा गटप्रमुख उद्धव ठाकरेंच्या अडचणीत सुद्धा वाढ झाली आहे.

त्यानंतर उबाठा गटाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी समन्स बजावण्यात आलं आहे. मुळात आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, लॉकडाऊनचा काळ हा प्रत्येकासाठी कशाप्रकारे संघर्षांचा काळ होता. पंरतु यावेळी कामगार आणि गरीबांना दिल्या जाणाऱ्या खिचडीत ही काही लोकांनी घोटाळा केला. आणि गरीब कामगारांसोबत ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांच्या मित्रपरिवाराने ही लाखो रुपयांची खिचडी खाल्ली. या प्रकरणात किशोरी पेडणेकरांसह पालिकेचे वरिष्ठ अधिकारी पी. वेलरासू यांना देखील ईडीने समन्स बजावले आहे. या खिचडी घोटाळ्यात सुजीत पाटकर,संजय राऊत यांचे भाऊ संदिप राऊत आणि कन्या विधिता राऊत यांचे देखील कनेक्शन असल्याचे उघडकीस आले होते.

तसेच याआधी कोविड काळात बॉडी बॅग खरेदीत घोटाळा केल्याचा आरोपामुळे दि. ५ ऑगस्ट रोजी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कलम ४२० आणि कलम १२० ब या दोन कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे ६० लाखांची सोन्याची बिस्कीट , ५०० कोटींचा भुखंड , साई रिसोर्टचे बेकायदेशीर बांधकाम यामुळे ठाकरे गटाचे नेते चक्रव्युहात अडकल्याचे दिसत आहेत. तरी याप्रकरणांमुळे त्यांना ही संजय राऊतांप्रमाणे तुरुंगवारी करावी लागते का? हे येणारा काळच ठरवेल.