२८ लाखांचा ५८ किलो गांजा जप्त; ज्वारीच्या शेतात गांजाची शेती करणाऱ्याविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…

---Advertisement---

 

आगामी सण व उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू वाहतूक, साठा, अवैध अग्निशस्त्र, अंमली पदार्थांची लागवड यावर जास्तीत जास्त कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी दिल्या होत्या.

दिनांक १२ ऑक्टोबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मोलगी पोलीस ठाणे हद्दीतील हुणाखांब गावाचे शेत शिवारातील मोदरापाडा येथे एका इसमाने त्याच्या ज्वारी पिकाच्या शेतात स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीररित्या मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणाऱ्या गुंगीकारक गांजाची लागवड करून जोपासना केली आहे.

माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी तात्काळ पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोलगी पोलीस ठाणे हद्दीतील हुणाखांब गावाच्या शेत शिवारातील मोदरापाडा येथील ज्वारीच्या शेताची पाहणी केली असता, तेथे २८ लाख ५८ हजार ३०० रुपये किमतीचा ५८ किलो २४६ ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला.

सदर गांजाची झाडे आरोपी सोत्या काल्या तडवी, वय ६० वर्षे, रा. मोदरापाडा, हुणाखांब, पो. पिंपळखुटा, ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार याने त्याच्या ज्वारीच्या शेतामध्ये लावल्याचे आढळून आल्याने त्यास जप्त मुद्देमालासह ताब्यात घेऊन कायदेशीर प्रक्रिया करण्यात आली आहे.

तसेच बेकायदेशीररित्या गांजा सदृश्य झाडांची लागवड करून संवर्धन व जोपासना करताना आरोपीविरुद्ध मोलगी पोलीस ठाणे येथे गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम-१९८५ च्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस उप निरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, महेश निकम, पोलीस हवालदार दिनेश चित्ते, स्वप्नील गोसावी, मुकेश तावडे, जितेंद्र पाडवी, पोलीस अंमलदार अनिल नागरगोजे, अभय राजपूत, हेमंत बारी, विनोद पाटील, रविंद्र अहिरे यांच्या पथकाने केली. 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---