---Advertisement---
पंढरपूर प्रतिनिधी: महाराष्ट्राची आध्यात्मिक परंपरा जपणाऱ्या आषाढी वारीच्या अनुषंगाने भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने २० कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला आहे. या निधीतून वारी मार्गावरील तसेच पंढरपूर परिसरातील विविध विकासकामे आणि आवश्यक सुविधा उभारल्या जाणार आहेत.
जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महसूल, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, पोलीस व नगरपरिषद प्रशासन यांच्या समन्वयातून वारीची तयारी वेगाने सुरू आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विभाग नियोजन पूर्ण करत असून सध्या विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता असल्याने आषाढी वारीतील विविध निविदा प्रक्रियेसाठी निवडणूक आयोगाकडून परवानगी मिळाली आहे. असे देखील त्यांनी सांगितले.
भाविकांच्या सुरक्षित, स्वच्छ आणि सुखकर प्रवासासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले, तसेच संबंधित विभागांचे अधिकारी यांनी वारी मार्गाची पाहणी करून आवश्यक सूचना दिल्या आहेत. वारीदरम्यान वाढणारी गर्दी लक्षात घेऊन सुरक्षा, वाहतूक नियोजन आणि आरोग्य सेवांवर विशेष भर देण्यात आला आहे.निधीतून वारी मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती, तात्पुरते निवारा मंडप, स्वच्छतागृहे, स्नानगृहे, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रकाशयोजना आणि विश्रांती केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. तसेच वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी फिरते दवाखाने, रुग्णवाहिका, प्राथमिक उपचार केंद्रे आणि आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवण्यात येणार आहे.
महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग भाविकांसाठी स्वतंत्र सहाय्यता केंद्र सुरू करण्यात येणार असून हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी नियंत्रण कक्ष कार्यरत राहणार आहे. सीसीटीव्ही यंत्रणा, ध्वनिक्षेपक व्यवस्था आणि अतिरिक्त पोलीस बंदोबस्ताच्या माध्यमातून सुरक्षा अधिक मजबूत करण्यात येणार आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत वारी मार्ग, मुक्काम स्थळे आणि चंद्रभागा नदी परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी सर्व यंत्रणा सज्ज असून यंदाची वारी अधिक शिस्तबद्ध, सुरक्षित आणि सुविधायुक्त होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
भाविकांसाठी उपलब्ध होणाऱ्या सुविधाशुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्थातात्पुरती निवास व्यवस्थाविश्रांती मंडप व सावली शेडस्वच्छतागृहे व स्नानगृहेफिरते वैद्यकीय पथकप्राथमिक उपचार केंद्रेरुग्णवाहिका सेवाऔषधोपचार सुविधामहिला सहाय्य केंद्रदिव्यांगांसाठी विशेष सुविधाहरवलेल्यांसाठी मदत कक्षमाहिती व मार्गदर्शन केंद्रसीसीटीव्ही सुरक्षा व्यवस्थाअतिरिक्त पोलीस बंदोबस्तआपत्कालीन नियंत्रण कक्षस्वच्छता व कचरा व्यवस्थापनप्रकाशयोजना व्यवस्थामोबाईल चार्जिंग केंद्रेवाहतूक व पार्किंग सुविधापालखी तळांवरील मूलभूत सुविधाआदी सुविधांचा समावेश करण्यात आलेला आहे.









