---Advertisement---
दोंडाईचा शहरातील स्टेशन परिसरात सुमारे दीड वर्षांचे एक बालक बेवारस अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. २२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास धनलक्ष्मी फर्टिलायझर्सजवळ हे बालक आढळले. बालकाचे नाव, गाव किंवा कुटुंबीयांबाबत कोणतीही माहिती त्यावेळी उपलब्ध नव्हती.
बालक आढळल्यानंतर दोंडाईचा पोलिसांनी त्याच्या आई-वडिलांसह नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, शोध घेऊनही कुटुंबीयांचा ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर २३ ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास बालकाला दोंडाईचा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर धुळे येथील बाल न्याय मंडळाच्या आदेशानुसार बालकाला शिशुगृहात दाखल करण्यात आले आहे.
बालकाच्या आई-वडिलांची किंवा नातेवाईकांची माहिती मिळावी, यासाठी पोलिसांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले आहे. या बालकाला ओळखणाऱ्या किंवा त्याच्या कुटुंबीयांबाबत माहिती असलेल्या नागरिकांनी दोंडाईचा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे यांनी केले आहे.
बालकाचे वर्णन
- वय : अंदाजे दीड वर्ष
- नाव : माहिती उपलब्ध नाही
- वर्ण : सावळा
- गळ्यात : फिकट राखाडी रंगाचा धागा
- ओळखण्याची खूण : हात-पायावर बारीक पांढरे डाग तसेच जन्मखुणा
पोलिसांकडून बालकाच्या कुटुंबीयांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असून, नागरिकांनी उपलब्ध माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.









