“रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी बोनसची घोषणा; किती दिवसांच्या वेतनाइतकी मिळणार रक्कम?

---Advertisement---

 

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पात्र रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांच्या वेतनाइतका उत्पादकता आधारित बोनस (पीएलबी) देण्यास मंजुरी देण्यात आली. या निर्णयाचा देशभरातील सुमारे ११ लाख ४० हजार ७७० कर्मचाऱ्यांना लाभ होणार असून, यासाठी २,००९.६१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

पात्र कर्मचाऱ्यांना किती बोनस मिळणार?

या निर्णयानुसार, पात्र कर्मचाऱ्याला ७८ दिवसांच्या बोनसपोटी कमाल १७,९५१ रुपये मिळू शकतात. ट्रॅक मेंटेनर, लोको पायलट, ट्रेन मॅनेजर, स्टेशन मास्तर, तंत्रज्ञ, पर्यवेक्षक, पॉइंट्समन तसेच इतर पात्र गट ‘क’ कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. हा बोनस पात्र अराजपत्रित कर्मचाऱ्यांसाठी असून, प्रत्यक्ष रक्कम लागू नियमांनुसार ठरेल.

रेल्वेच्या कामगिरीची दखल

आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये भारतीय रेल्वेने १,६७० दशलक्ष टन मालवाहतूक केली, तर सुमारे ७.४१ अब्ज प्रवाशांनी रेल्वेने प्रवास केला. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या योगदानाची दखल घेऊन बोनस मंजूर करण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

सामाजिक सुरक्षा योजनांनाही मंजुरी

केंद्रीय मंत्रिमंडळाने सामाजिक सुरक्षा योजनांचा विस्तार करण्यासही मंजुरी दिल्याची माहिती आहे. या योजनांसाठी २०३१ पर्यंत ५३,४२८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच दिव्यांगत्वाच्या निकषांशी संबंधित पात्रतेची मर्यादा ८० टक्क्यांवरून ४० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला आहे.

दिवाळीपूर्वी बोनस मंजूर झाल्याने पात्र रेल्वे कर्मचाऱ्यांना सणाच्या काळात आर्थिक दिलासा मिळणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---