---Advertisement---
पुण्यात विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी गेलेले महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचा दौरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोवरून चर्चेत आला आहे. शिवाजीनगर येथील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयाच्या पाहणीदरम्यान हा प्रकार घडला.
अमित ठाकरे यांनी महाविद्यालयातील कँटिनमधील जेवणाची गुणवत्ता आणि खेळाडूंना प्रशिक्षक उपलब्ध नसल्याच्या मुद्द्यावरून मुख्याध्यापकांकडे विचारणा केली. याचवेळी एका विद्यार्थ्याने कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेजारी नरेंद्र मोदी यांचा फोटो लावल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले.
यानंतर अमित ठाकरे यांनी “शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाजूला नरेंद्र मोदींचा फोटो कशासाठी?” असा सवाल केला. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी मोदींचा फोटो तेथून हटवला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अमित ठाकरेंकडून फोटो हटवण्याच्या कृतीचं समर्थन
या प्रकारावर बोलताना अमित ठाकरे यांनी फोटो हटवण्याच्या कृतीचं समर्थन केलं. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान असले तरी त्यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी होऊ शकत नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.
शासकीय महाविद्यालयात पंतप्रधानांचा फोटो लावण्याचा प्रोटोकॉल असेल, तर तो स्वतंत्र ठिकाणी लावावा; मात्र शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेजारी लावू नये, असं अमित ठाकरे म्हणाले. “आम्ही महाराजांचा अपमान सहन करणार नाही,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
भाजपकडून अमित ठाकरेंवर टीका
दरम्यान, अमित ठाकरेंच्या या भूमिकेवर भाजपकडून टीका करण्यात आली आहे. पुणे महापालिकेतील भाजपचे गटनेते गणेश बीडकर यांनी या प्रकाराचा निषेध केला.
“तो फोटो नरेंद्र मोदींचा नसून देशाच्या पंतप्रधानांचा आहे. प्रोटोकॉलनुसार शासकीय कार्यालयांमध्ये राष्ट्रपती आणि पंतप्रधानांचे फोटो लावले जातात. कदाचित अमित ठाकरेंना हा प्रोटोकॉल माहिती नसावा,” अशी प्रतिक्रिया गणेश बीडकर यांनी दिली.
पंतप्रधान हे घटनात्मक पद असून ते कोणत्याही एका पक्षाचे नसतात, तर संपूर्ण देशाचे पंतप्रधान असतात, असंही बीडकर यांनी म्हटलं.
विद्यार्थ्यांशी थेट संवादाचा अमित ठाकरेंचा दौरा
दरम्यान, अमित ठाकरे पुण्यातील सात महाविद्यालयांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी, सुरक्षा, भ्रष्टाचार आणि इतर प्रश्न जाणून घेण्यासाठी विविध उपक्रमही या दौऱ्यात आयोजित करण्यात आले आहेत. मात्र, पहिल्याच भेटीत मोदींच्या फोटोवरून झालेला वाद आता राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे.









