नशिराबाद शिवारात दुष्काळसदृश्य पंचनाम्यांना सुरुवात; पावसाअभावी खरीप पिकांचे नुकसान; शेतकऱ्यांना अनुदानाची अपेक्षा…

---Advertisement---

 

यंदा पावसाने दडी मारल्याने नशिराबाद परिसरातील खरीप हंगामातील पिकांवर मोठा परिणाम झाला असून, पावसाअभावी शेतकरी हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने २५ सप्टेंबर २०२६ रोजी दुष्काळ जाहीर केला असून, जळगाव जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

त्यानुसार जळगाव तालुक्यातील गावांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून पीक पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार पीक पाहणी व पंचनामे करण्यासाठी संबंधित विभागांची समिती गठीत करण्यात आली आहे. तालुकास्तरावर तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत गावनिहाय शेतांची प्रत्यक्ष पाहणी करून पीक पंचनामे करण्याबाबत संबंधित यंत्रणेला आदेश देण्यात आले आहेत.

त्यानुसार प्रत्येक गावासाठी ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि कृषी विभागातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित अधिकारी व कर्मचारी शेतशिवारात प्रत्यक्ष भेट देऊन पिकांची पाहणी करीत असून, पावसाअभावी झालेल्या नुकसानीची नोंद घेऊन पंचनामे करण्यात येत आहेत.

नशिराबाद शिवारात ग्राम महसूल अधिकारी रुपेश ठाकुर, सहायक कृषी अधिकारी मनीषा कोंगे, ग्रामपंचायत अधिकारी पल्लवी मोरे आणि पीक पाहणी सहाय्यक संतोष कोळी यांच्या माध्यमातून पीक पाहणी व पंचनाम्याचे काम सुरू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष जाऊन पिकांची स्थिती, पावसाअभावी झालेले नुकसान तसेच संबंधित बाबींची पाहणी करून नोंद करण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने पिकांना आवश्यक पाणी मिळाले नाही. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा परिस्थितीत शासनाकडून मिळणाऱ्या दुष्काळी मदतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. दुष्काळ अनुदानाचा लाभ पात्र शेतकऱ्यांना मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी आधार कार्ड, फार्मर आयडी, बँक पासबुक आदी कागदपत्रे तयार ठेवावीत. आवश्यकतेनुसार तलाठी कार्यालयाशी संपर्क साधून कागदपत्रे जमा करावीत, असे आवाहन संबंधित यंत्रणेकडून करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---