---Advertisement---
मुंबई/परभणी: “घरी बोलावून मंत्री केलं ही माझी चूक होती,” या शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी अत्यंत शेलक्या शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. “उद्धव ठाकरेंनी मला आधी कॅबिनेट मंत्रिपदाचा शब्द दिला होता, पण प्रत्यक्ष शपथ देताना मात्र राज्यमंत्रिपद देऊन माझी फसवणूक केली,” असा खळबळजनक गौप्यस्फोट बच्चू कडू यांनी केला आहे. ‘प्रहार’ पक्ष विसर्जित करून धनुष्यबाण हाती घेतल्यानंतर कडू आणि ठाकरे यांच्यातील वाद आता चांगलाच पेटला आहे.
तुम्ही आधी मुख्यमंत्री झाले की मी आधी मंत्री? : बच्चू कडूंचा थेट सवाल
टीव्ही ९ मराठीशी बोलताना बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरेंच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला. कडू म्हणाले, “उद्धव ठाकरेंकडून मला अशा बालिश वक्तव्याची अपेक्षा नव्हती. मला त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे— तुम्ही आधी मुख्यमंत्री झाले की मी आधी राज्यमंत्री झालो? २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असताना मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा होणार, याबाबत मोठा संभ्रम होता.
तेव्हा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपकडून मला मोठ्या ऑफर्स होत्या.”
’एकनाथ शिंदेंनी घडवली होती भेट’
“तेव्हा शिवसेनेने माझ्याविरोधात उमेदवार दिला होता आणि स्वतः उद्धव ठाकरेंनी माझ्या पराभवासाठी सभा घेतली होती. तरीही, एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करून माझी आणि उद्धव ठाकरेंची भेट घडवून आणली. आम्ही ‘मातोश्री’वर गेलो आणि त्यांच्या मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा दिला. आम्ही पाठिंबा दिला म्हणून ते मुख्यमंत्री झाले, हे ठाकरे आज विसरत आहेत,” असा टोला कडू यांनी लगावला.
कॅबिनेटचा शब्द दिला, पण शंकरराव गडाखांना झुकते माप!
कॅबिनेट मंत्रिपदाच्या अटीवरच पाठिंबा दिल्याचा दावा करत बच्चू कडू पुढे म्हणाले, “उद्धव ठाकरेंनी मला सुरुवातीला कॅबिनेट मंत्रिपद देण्याचे स्पष्ट कबूल केले होते. शिवसेनेचे संख्याबळ जास्त दिसावे आणि मुख्यमंत्रिपदावरील दावा मजबूत व्हावा, यासाठी आमची मदत घेण्यात आली. मात्र, ऐनवेळी शब्द फिरवून मला राज्यमंत्रिपद दिले आणि माझ्याऐवजी शंकरराव गडाख यांना कॅबिनेट मंत्री केले. तरीही आम्ही सोबत राहिलो, पण आता ते उपकाराची भाषा करत आहेत.”
…म्हणून उद्धव ठाकरे कडाडले होते!
परभणीचे ‘प्रहार’ जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधणे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह ‘मातोश्री’वर जाऊन ठाकरे गटात प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडू यांचे नाव न घेता निशाणा साधला होता. “आपल्यातून जो गेला तो जुना शिवसैनिकच होता. घरी बोलावून मंत्री केलं ही माझीच चूक झाली. लोभापायी जे गेले त्यांना जाऊ द्या, लढणारे कार्यकर्ते आजही माझ्यासोबत आहेत,” अशी टोलेबाजी ठाकरेंनी केली होती.
’सामना’तूनही बच्चू कडूंची ‘वस्त्रहरण’ टीका!
दुसरीकडे, शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातूनही बच्चू कडू यांच्यावर अत्यंत बोचरी टीका करण्यात आली आहे. “२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर कडू यांची आमदारकीची वस्त्रे जनतेने उतरवली होती. तेव्हापासून या तडफडणाऱ्या आत्म्याची मंत्रिपदासाठी धडपड सुरू होती. शेवटी आमदारकीसाठी त्यांनी मिंधे पक्षात प्रवेश केला,” अशा शब्दांत ‘सामना’तून त्यांच्यावर हल्लाबोल करण्यात आला आहे.
बच्चू कडू यांनी थेट मुख्यमंत्रिपदाच्या वेळच्या ‘मातोश्री’वरील अंतर्गत घडामोडींवरून पडदा उठवल्यामुळे आता ठाकरे गट यावर काय प्रत्युत्तर देतो, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. विलीनीकरणानंतर कडू आणि ठाकरेंमधील राजकीय युद्ध आता वैयक्तिक आरोपांच्या पातळीवर पोहोचले आहे.









