---Advertisement---
महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेल्या गुटखा, पानमसाला आणि तंबाखूचा साठा केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाच्या धुळे विभागाने पिंपळनेर येथे मोठी कारवाई केली आहे. या छाप्यात तब्बल २० हजार ३८२ पॅकेट्स जप्त करण्यात आली असून, त्यांची किंमत ३० लाख ९१ हजार ९०० रुपये आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी, ३ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे दोन वाजता अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने पिंपळनेर येथील ईदगावपाडा-सटाणा रोड परिसरात छापा टाकला. यावेळी एमएच ४६ बीएम ६०९७ आणि एमएच ४६ बीयू ७८८५ क्रमांकाच्या वाहनांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान या वाहनांमध्ये महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेला गुटखा, पानमसाला आणि तंबाखूचा साठा आढळून आला. पथकाने हा माल ताब्यात घेतला. तपासणीत एकूण २० हजार ३८२ पॅकेट्स असल्याचे निष्पन्न झाले. जप्त केलेल्या मालाची बाजारातील किंमत ३० लाख ९१ हजार ९०० रुपये असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
या प्रकरणी साहेबराव वंजी साबळे, गणेश वंजी साबळे आणि संदीप गुलाब ठाकरे (तिघेही रा. बल्हाणे, ता. साक्री, जि. धुळे) यांच्याविरुद्ध पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे, सहआयुक्त (अन्न) मंगेश माने आणि धुळेचे सहायक आयुक्त (अन्न) गोपाल माहोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेत आनंद पवार, शशिकांत राणे, अरविंद राऊत आणि मंगेश भावसार यांनी सहभाग घेतला. दरम्यान, राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटखा आणि पानमसाल्याची अवैध विक्री तसेच साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरू राहील, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.
पिंपळनेरमध्ये प्रतिबंधित गुटख्याचा एवढा मोठा साठा आढळल्याने स्थानिक पोलिसांच्या माहिती संकलन यंत्रणेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. जिल्हास्तरीय पथकाला गोपनीय माहिती मिळून मध्यरात्री कारवाई करता आली, तर स्थानिक पोलिसांना या अवैध साठ्याची माहिती का मिळाली नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शहरात प्रतिबंधित गुटख्याची विक्री आणि साठवणूक सुरू असल्याची माहिती स्थानिक यंत्रणेपर्यंत पोहोचत नाही की त्याकडे दुर्लक्ष होत आहे, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. त्यामुळे पिंपळनेर पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन गुटख्याची विक्री, साठवणूक आणि पुरवठा करणाऱ्यांविरोधात स्वतंत्र मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.
केवळ दुसऱ्या विभागाच्या कारवाईनंतर हालचाल करण्याऐवजी स्थानिक पोलिसांनी स्वतःहून पुढाकार घेऊन अशा अवैध व्यवसायांना आळा घालावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.









