---Advertisement---
वाशिम : महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षांतराचे वारे वेगाने वाहत असताना आता वाशिम जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज हा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश मापारी यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिल्यानंतर तातडीने आपल्या समर्थकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर रात्री उशिरा सुमारे २०० ते २५० पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामपातळीवरील समर्थकांचा मोठा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना झाला. तब्बल २९ वाहनांचा ताफा वाशिममधून मुंबईकडे निघाल्याने जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
जिल्हाप्रमुख पदावरून हटवल्यानंतर वाढली नाराजी
उद्धव ठाकरे गटाने काही दिवसांपूर्वीच वाशिम जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सुरेश मापारी यांच्याकडून काढून घेत बालाजी वानखेडे यांच्याकडे सोपवली होती. या निर्णयामुळे मापारी प्रचंड नाराज असल्याची चर्चा होती. तसेच स्थानिक पातळीवरील अंतर्गत राजकारण आणि खासदार संजय देशमुख यांच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे बोलले जात होते.
यापूर्वी सुरेश मापारी हे शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र अखेर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे.
आगामी निवडणुकांवर परिणाम होण्याची शक्यता
सुरेश मापारी हे वाशिम जिल्ह्यातील प्रभावशाली नेते मानले जातात. त्यांनी यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य, अर्थ व बांधकाम समिती सभापती तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशी अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. ग्रामीण भागात त्यांचा मोठा जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे असल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांमध्ये ठाकरे गटाला याचा मोठा फटका बसू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.









