---Advertisement---
राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारी बातमी समोर येत आहे. शिवसेना शिंदे गटाच्या एक बड्या नेत्यावर अज्ञातांकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला असून गोळीबारही करण्यात आला आहे.
हि घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात सोमवारी रात्री घडली असून गोळीबाराच्या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाशी संबंधित युवा सेनेचे पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे.
रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास युवा सेनेचे पदाधिकारी प्रशांत कहाणे हे आपल्या वाहनातून गोंधवणी रोड परिसरातून जात होते. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या वाहनाला लक्ष्य करत गोळीबार केला. सुदैवाने गोळीचा नेम चुकल्याने कहाणे यांचा जीव वाचला.
घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करून तपासाची सूत्रे हाती घेतली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.
या घटनेमागे वैयक्तिक वाद किंवा स्थानिक व्यावसायिक स्पर्धेचा कोन असण्याची शक्यता तपासली जात आहे. मात्र, हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.









