---Advertisement---
जळगाव शहरात गाजलेल्या एमडी ड्रग्स आणि अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणानंतर प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपी रईस देशमुख यांच्या अनधिकृत बांधकामावर जळगाव महानगरपालिकेने बुलडोझर कारवाई करत गुन्हेगारीविरोधातील आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
जळगाव महापालिकेच्या पथकाने पोलिस बंदोबस्तात ही कारवाई केली. संबंधित बांधकाम परवानगीविना उभारण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला असून नियमानुसार अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया राबविण्यात आली.
एमडी ड्रग्स प्रकरण आणि अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी पोलिसांसोबत महापालिका प्रशासनही सक्रिय झाले आहे. आरोपींविरोधात केवळ कायदेशीर कारवाईच नव्हे तर अनधिकृत मालमत्तांवरही कारवाई करण्यात येत असल्याने शहरात या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू आहे.
गुन्हेगारीला कोणतीही माफी दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. शहरात बेकायदेशीर बांधकामे करून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका कायम राहणार असल्याचे महापौर दीपमाला काळे यांनी सांगितले.
या प्रकरणातील इतर आरोपींच्या अनधिकृत बांधकामांचीही माहिती प्रशासनाकडून तपासली जात असून नियमबाह्य बांधकामे आढळल्यास त्यांच्यावरही बुलडोझर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
गुन्हेगारी प्रवृत्तीला चाप लावण्यासाठी पोलिस विभाग आणि महापालिका प्रशासन यांच्यात समन्वयाने कारवाई सुरू असल्याने शहरातील गुन्हेगारीविरोधातील मोहिमेला वेग आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचे धाबे दणाणले असून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना कठोर संदेश देण्यात आला आहे.









