---Advertisement---
बीड जिल्ह्यात एक आगळावेगळा थक्क करणार प्रकार समोर आला आहे. अधिकमासानिमित्त जावयासाठी घेतलेली सोन्याची अंगठी चक्क मांजरीच्या पोटात गेल्याने एका कुटुंबाची चांगलीच धावपळ उडाली. या घटनेची परिसरात मोठी चर्चा रंगली आहे.
अधिकमासानिमित्त अनेक ठिकाणी जावयाचा सन्मान करण्याची परंपरा आहे. याच पार्श्वभूमीवर बीडमधील एका कुटुंबाने आपल्या जावयाला सरप्राईज देण्यासाठी सोन्याची अंगठी एका धोंड्यामध्ये (गोड पदार्थ) लपवून ठेवली होती. हा धोंडा इतर धोंड्यांसोबत ठेवण्यात आला होता.
मात्र घरातील आवराआवरी सुरू असताना अचानक घरात आलेल्या एका मांजरीने नेमका अंगठी असलेला धोंडा खाल्ला. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांची एकच धांदल उडाली. सोन्याची अंगठी परत मिळावी यासाठी त्यांनी मांजरीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली.
अंगठी नैसर्गिकरित्या बाहेर पडेल या आशेने मांजरीला काही दिवस घरातच ठेवण्यात आले. मात्र अपेक्षेप्रमाणे अंगठी बाहेर न आल्याने कुटुंबीयांनी पशुवैद्यकांची मदत घेतली. मांजरीला औषधे देऊन उलटी करण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु त्याचा अपेक्षित परिणाम झाला नाही.
दरम्यान, उपचारादरम्यान मांजरीचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. त्यानंतर अंगठी शोधण्यासाठी मृत मांजरीच्या पोटाची तपासणी करण्यात आली. त्यावेळी सोन्याची अंगठी पोटात असल्याचे आढळून आले आणि ती बाहेर काढण्यात आली.
या अनोख्या घटनेची माहिती परिसरात पसरल्यानंतर अनेकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. जावयासाठी ठेवलेली अंगठी आणि ती गिळणारी मांजर यांची ही घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.









