---Advertisement---
ऑक्टोबर हीटमुळे वाढलेल्या उकाड्याने त्रस्त झालेल्या जळगावकरांना महिन्याच्या अखेरीस अवकाळी पावसाचा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हवामानातील बदलांमुळे २६ ते २९ ऑक्टोबरदरम्यान जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चाळीसगाव, पारोळा आणि पाचोरा तालुक्यांत पावसाचा जोर तुलनेने अधिक राहू शकतो, तर इतर भागांतही हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दिवसा उन्हाचा चटका, रात्री गारवा
जळगाव जिल्ह्यात यंदा सप्टेंबरच्या मध्यापासून पावसाचे प्रमाण कमी झाले असून, परतीच्या पावसाचीही अपेक्षित हजेरी लागलेली नाही. दुसरीकडे, ऑक्टोबरमधील वाढत्या तापमानामुळे पारा सुमारे ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. दिवसा उन्हाचा चटका जाणवत असताना रात्री आणि पहाटेच्या वेळी तुलनेने गारवा अनुभवायला मिळत आहे.
पावसासाठी पोषक वातावरण कसे तयार होत आहे?
हवामानातील बदलांमागे उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि बंगालच्या उपसागराकडून येणारे बाष्पयुक्त वारे यांचा प्रभाव असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय, २४ ऑक्टोबरच्या आसपास अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकण, पुणे आणि नाशिकमार्गे उत्तर महाराष्ट्राकडे ढग सरकण्याची शक्यता असून, त्यातून जळगाव जिल्ह्यात पाऊस पडू शकतो.
पुढील काही महिनेही हवामानात चढ-उतार?
प्रशांत महासागरातील एल निनोच्या स्थितीचाही हवामानावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी तीन ते चार महिन्यांत वातावरणात वारंवार बदल होऊन अवकाळी पावसाच्या घटना घडू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मात्र, पावसाचा प्रत्यक्ष जोर आणि कोणत्या भागात किती पाऊस पडेल, हे हवामानातील पुढील घडामोडींवर अवलंबून असेल. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी हवामान विभागाच्या अद्ययावत अंदाजाकडे लक्ष ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे.









