---Advertisement---
शेंदुर्णी येथील श्री कृष्ण माध्यमिक विद्यालय, पाचोरा रोड येथे इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती विषयावर विशेष मार्गदर्शन चर्चासत्र उत्साहात संपन्न झाले. गुरुवार, दि. ३० जुलै रोजी सकाळी ७ ते ८ या वेळेत हे सत्र आयोजित करण्यात आले होते.
या सत्रात प्रियदर्शनी भांडारकर व खुशबू लांबोळे यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ऑनलाइन फसवणूक, फिशिंग, विशिंग, स्मिशिंग, ओटीपी व पासवर्ड सुरक्षितता, मजबूत पासवर्डचे महत्त्व तसेच द्विस्तरीय प्रमाणीकरण (2-Factor Authentication) याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
यासोबतच सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, बनावट लिंक व क्यूआर कोड स्कॅमपासून सावध राहणे, सायबर बुलिंग, डिजिटल गोपनीयता, अज्ञात व्यक्तींशी ऑनलाइन संपर्क टाळणे आणि मोबाईल अॅप्स डाउनलोड करताना घ्यावयाची खबरदारी याविषयीही मार्गदर्शन करण्यात आले. सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचा बचाव कसा करावा, याबाबत विद्यार्थ्यांना विविध उदाहरणांच्या माध्यमातून समजावून सांगण्यात आले.
संवादात्मक पद्धतीने पार पडलेल्या या चर्चासत्राला सुमारे २५० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून सायबर सुरक्षेविषयी अधिक माहिती जाणून घेतली. तसेच सुरक्षित डिजिटल जीवनशैली अंगीकारण्याचा संकल्प केला.
या कार्यक्रमासाठी श्री कृष्ण माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. मीराबाई इंगळे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.









