---Advertisement---
अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी या गावाची अनेक दिवसा पासून असलेली लाईटची समस्या सुटता सुटत नसल्याने मोलगी परिसरातील सर्व गावांना या समस्येचा फटका बसत असून परिसरातील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
मोलगी तालुक्यासाठी सुरू असलेला वीज पुरवठा मागील दहा ते बारा दिवसा पासून खंडित झाला असून तालुका लेवलच्या गावाला जोळणाऱ्या परिसरातील सर्व गाव पाड्यावरील लोकांना या समस्येचा सामना करावा लागत आहे.ही समस्या सुटवी म्हणून मागील चार वर्षापासुन सुरवाणी येथील १३२ के.वी.क्षमतेचे सबस्टेशन सुरू करण्यात आले होते.परंतु तरीही मागील वर्षा प्रमाणे या वर्षी ही एन खरीप हंगाम सुरू होताच परिसरातील लोकांना या समस्येचा सामना करावा लागत आहे.
मोलगी शहरातील वीज पुरवठा हा नेहमीच खंडित राहत असल्याने येथील बँकेचा व्यवहार अनेक दिवसा पासून ठप्प असून मोबाईल टॉवर, ऑनलाइन कामे,शाळेतील विद्यार्थ्यांना पाण्याची समस्या अशा अनेक घटकांवर परिणाम झाला आहे.आता पावसाळ्याचे वातावरण असल्याने साप, विंचूसारखे प्राणी सर्वाधिक निघत आहे. शिवाय जंगली श्वापदे देखील नागरी वस्तीत शिरु लागले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना सद्यस्थितीत सर्वाधिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.रात्रीत सापांच्या दंशाने जीवास मुकावे लागण्याची भीती या गावातील ग्रामस्थांना सतावत आहे. संपूर्ण गावे अंधारात असल्याने येथील शेतकरी, कष्टकरी, महिला, लहान मुले, विद्यार्थी आदींना जीवघेण्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. अनेक लोकं आधीच अवाजवी लाईट बीलाने आणि नेटवर्कच्या समस्येने हैराण होते.त्यातच खंडित वीज पुरवठा असल्याने सामान्य नागरीकांच्या समस्येत भर पडली आहे.
मोलगी परिसरातील लाईट, आरोग्य, शिक्षण, रोजगार, पाणी रस्ते, आणि ट्रॅफिक नेहमीच्याच गंभीर समस्या आहे त्या वेळीच सोडवल्यास हे प्रश्नच निर्माण होणार नाही पण संबंधित यंत्रणेतील उदासीन अधिकारी व कर्मचारी यांच्या उदासीन भूमिकेमुळेच दर वर्षी या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळेच लोक प्रतिनिधींनी वेळीच या समस्यांकडे लक्ष देऊन गंभीर समस्या वर नियोजन करून समस्या निराकरण करण्याची मागणी नागरिकांकडून सतत करण्यात येत आहे.









