---Advertisement---
नंदुरबार शहरातील अमृत चौक परिसरातील श्री रामदूत हनुमान मंदिरात गुरुवारी पहाटे धाडसी चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. चोरट्याने मंदिराच्या प्रवेशद्वाराचा कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला आणि हनुमान मूर्तीवरील चांदीचे दागिने लंपास केले. चोरीला गेलेल्या दागिन्यांचे वजन सुमारे ७५० ग्रॅम असून त्यांची किंमत अंदाजे दोन लाख रुपये असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे दोन वाजेच्या सुमारास चोरट्याने मंदिरात प्रवेश केला. मंदिरातील चांदीचे दागिने घेऊन त्याने घटनास्थळावरून पोबारा केला. सकाळी नेहमीप्रमाणे दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या निदर्शनास मंदिरात चोरी झाल्याचे आले. त्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पथक मंदिरात दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत तपासाला सुरुवात केली. मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजमध्ये संशयित चोरटा कैद झाला असून, त्याच्या हालचालींच्या आधारे पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. चोरट्याचा मार्ग काढण्यासाठी पोलिसांनी श्वानपथकाचीही मदत घेतली. यासोबतच ठसे तज्ज्ञ आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून, घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
दरम्यान, चोरी करणाऱ्या संशयिताचा लवकरात लवकर शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके शहराच्या वेगवेगळ्या दिशांना रवाना करण्यात आली आहेत. गजबजलेल्या अमृत चौक परिसरातील मंदिरातच चोरी झाल्याने परिसरातील भाविकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नंदुरबार शहर पोलीस करत असून, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे चोरट्याचा शोध घेतला जात आहे.









