---Advertisement---
विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी शिक्षकांकडे प्रभावी वक्तृत्वकला आणि संवादकौशल्य असणे अत्यंत आवश्यक आहे. भविष्यात कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही शाळेत अध्यापन करताना विद्यार्थ्यांशी योग्य संवाद साधता आला पाहिजे, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक व वक्ते मंदार केसकर यांनी केले.
येथील अध्यापक विद्यालयात आयोजित शारदीय नवरात्रोत्सवाच्या व्याख्यानमालेतील पहिल्या पुष्पाचे गुंफण करताना ते बोलत होते. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष नाना मालक कवठेकर, संस्थेचे सदस्य एस. पी. कुलकर्णी, डॉ. मिलिंद जोशी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. आर. वाघमारे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात शारदामातेच्या पूजनाने करण्यात आली. लेझीमच्या तालावर आणि स्वागतगीताने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर प्राचार्यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.आपल्या मनोगतात मंदार केसकर यांनी भावी शिक्षकांना वक्तृत्व आणि संवादकौशल्याचे महत्त्व पटवून दिले. शिक्षक हा मेणबत्तीसारखा असतो. तो स्वतः जळून इतरांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश निर्माण करतो, असे सांगत त्यांनी शिक्षकांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले.
एस. पी. कुलकर्णी यांनी शिक्षक कसा असावा, याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांसमोर जाताना पूर्ण तयारीनिशी जावे आणि आपल्याकडे असलेल्या ज्ञानाची जाणीव ठेवावी, असा मोलाचा सल्ला त्यांनी भावी शिक्षकांना दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. मिलिंद जोशी यांनी महाविद्यालयाशी असलेल्या आपल्या नात्याच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच जीवनात आयुर्वेदाचे महत्त्व विशद करताना आरोग्यदायी जीवनशैली, योग्य आहार-विहार आणि सात्त्विक आहार यांचा अंगीकार करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एच. आर. वाघमारे यांनी केले. विद्यार्थी मनोगतात आर्या बहिराडे यांनी आपले विचार व्यक्त केले, तर दिव्या पिसे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी छात्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. मान्यवरांच्या मार्गदर्शनातून भावी शिक्षकांना वक्तृत्व, संवादकौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्व समजून घेण्याची संधी मिळाली.









