मोदींचा फोटो हटवण्याच्या वादावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘प्रोटोकॉल असतो…’

---Advertisement---

 

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होत असतानाच एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर दाखल झाले आहेत. दिल्लीला येण्यामागे कोणताही विशेष विषय नसून, काही ठिकाणी होणाऱ्या स्थानिक निवडणुकांचा आढावा घेण्यासोबतच शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातील न्यायालयीन सुनावणीचा आढावा घेण्यासाठी दिल्लीला आल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, पुण्यातील महाविद्यालयात मनसे नेते अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवण्यात आल्याच्या वादावरही शिंदे यांनी भाष्य केले. या घटनेवरून भाजप आणि मनसेमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असताना शिंदे यांनी सरकारी कार्यालयांमध्ये राष्ट्रपती आणि पंतप्रधानांचे फोटो लावण्याचा प्रोटोकॉल असल्याचे सांगितले.

‘मोदींनाही शिवाजी महाराजांशी तुलना आवडणार नाही’

एकनाथ शिंदे म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दैवतासमान मानले आहे. शिवाजी महाराजांचा नौदलाच्या ध्वजावर सन्मान करण्यात आला, तसेच सरकार स्थापन करतानाही मोदींनी शिवरायांचा उल्लेख केला होता.

मात्र, छत्रपती शिवाजी महाराज आणि नरेंद्र मोदी यांची तुलना करणे योग्य नाही, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. “मोदींनाही शिवाजी महाराजांशी तुलना केलेली आवडणार नाही; मात्र कार्यालयात काही फोटो लावण्याचा प्रोटोकॉल असतो,” अशी भूमिका त्यांनी मांडली.

धनुष्यबाणावरून ठाकरेंवर निशाणा

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावरूनही शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटावर निशाणा साधला. धनुष्यबाण हे बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे होते, असे सांगत त्यांनी ठाकरेंच्या गटाच्या मागणीवर टीका केली.

“आधी बाळासाहेबांचे विचार गोठवले, आता धनुष्यबाण गोठवण्याची मागणी केली जात आहे,” अशा शब्दांत शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. न्यायव्यवस्थेवर आपला पूर्ण विश्वास असून, सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीनंतर या प्रकरणातील चित्र स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले.

मनोज जरांगे पाटलांनाही सकारात्मक भूमिकेचे आवाहन

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांनीही सकारात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहन केले. आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात मराठा समाजासाठी १० टक्के आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला, तसेच मराठा तरुणांना नोकरीच्या संधी मिळाव्यात यासाठी प्रयत्न करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

कुणबी प्रमाणपत्राचा प्रश्न सोडवण्यासाठी शिंदे समिती स्थापन करण्यात आली होती. इतर समाजांवर अन्याय न करता मराठा समाजाच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केल्याचा दावा शिंदे यांनी केला. त्यामुळे सध्याच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनीही सकारात्मक भूमिका घ्यावी, असे ते म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---