---Advertisement---
लग्नासाठी वारंवार फोन करून दबाव टाकणे आणि घरात येऊन धमकावल्याचा आरोप असलेल्या तरुणाच्या त्रासाला कंटाळून १९ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव येथे घडली. या प्रकरणी सोयगाव पोलिसांनी तत्परता दाखवत गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या १० तासांत संशयित तरुणाला अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, निंभोरा येथील करण अनिल वाघ हा तरुण संबंधित तरुणीला लग्नासाठी वारंवार फोन करत असल्याचा आरोप आहे. फोनवरून दबाव टाकण्यासोबतच तो तिच्या घरीही जात होता आणि लग्नासाठी धमकावत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे तरुणी मानसिक तणावात असल्याचे सांगण्यात येत आहे.
घरातच घेतला गळफास
सततच्या त्रासाला कंटाळून तरुणीने बुधवारी रात्री गोंदेगाव येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच सोयगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी तरुणीच्या मामाने पोलिसांत तक्रार दाखल केली.
पोलिसांची दहा तासांत कारवाई
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी करण अनिल वाघ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांनी तातडीने हालचाली करत निंभोरा येथून त्याला ताब्यात घेत अटक केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या दहा तासांत ही कारवाई करण्यात आली.
आरोपीला एक दिवसाची पोलीस कोठडी
अटकेनंतर संशयित करण वाघ याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तरुणीला दिलेल्या मानसिक त्रासामागील नेमकी पार्श्वभूमी, धमक्यांचे स्वरूप आणि या प्रकरणातील इतर बाबींचा पोलीस तपास करत आहेत.
पोलिसांच्या तपासातून पुढील तथ्ये समोर आल्यानंतरच या प्रकरणातील आरोपांची पूर्ण वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.









