---Advertisement---
जळगाव शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि शहराच्या विस्ताराला चालना देण्यासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या शिरसोली रस्ता ते एमआयडीसी-छत्रपती संभाजीनगर महामार्ग जोडणाऱ्या 100 फुटी रस्त्याच्या विकासकामाला लवकरच गती मिळणार आहे. या संदर्भात महापौर दीपमाला काळे यांच्या उपस्थितीत संबंधित शेतकरी आणि जमीन मालकांची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी पार पडली.
बैठकीत रस्त्याच्या कामातील अडथळे दूर करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. यावेळी नगरसेवक अरविंद देशमुख, नगररचनाकार अमोल पाटील आणि शहर अभियंता आर. टी. पाटील उपस्थित होते.
हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर एमआयडीसी परिसरातून मोठ्या प्रमाणावर वाहतूक या मार्गाने वळवता येईल. त्यामुळे इच्छादेवी चौक आणि अजिंठा चौफुली परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. तसेच शहराच्या भविष्यातील विकासासाठी हा मार्ग महत्त्वाचा दुवा ठरेल असं महापौर दीपमाला काळे यांनी सांगितले.
विशेष नियोजनाअंतर्गत विकसित होणाऱ्या या प्रकल्पात मुख्य रस्त्यासोबत सायकल ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक, दुतर्फा वृक्षारोपण आणि लँडस्केपिंगचा समावेश करण्यात येणार आहे. शहराच्या दर्जोन्नतीसाठी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जात आहे.
संबंधित जमीन मालकांना त्यांच्या जमिनीच्या बदल्यात ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राइट्स (TDR) देण्यात येणार आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही प्रक्रिया राबविण्यात येत असून जमीन मालकांनी टीडीआर स्वीकारून जमीन हस्तांतरित करण्यास सहमती दर्शवली आहे.महापौरांनी प्रशासनाला टीडीआर वितरणाची प्रक्रिया सुलभ आणि जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व लाभार्थ्यांना लवकरात लवकर टीडीआर प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकल्पासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून सर्व जमीन मालकांनी सहकार्य करावे, जेणेकरून रस्त्याचे काम वेगाने पूर्ण होऊन परिसराच्या विकासाला चालना मिळेल, असे आवाहन महापौर दीपमाला काळे यांनी केले.









