---Advertisement---
स्थानिक पातळीवर दुय्यम वागणूक मिळत असल्याचा आरोप; पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांची भेट घेणार…!
महायुतीचा घटक पक्ष असूनही स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित सन्मान आणि समन्वय मिळत नसल्याची नाराजी पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. भुसावळ येथे झालेल्या रावेर लोकसभा जिल्ह्याच्या मासिक आढावा बैठकीत हा मुद्दा चर्चेत आला.
शनिवार, २९ रोजी शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष तथा भुसावळचे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. आगामी काळातील संघटनात्मक कामकाज, स्थानिक प्रश्न आणि निवडणुकांच्या तयारीसह महायुतीतील समन्वयावर यावेळी चर्चा करण्यात आली.
पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत स्थानिक पातळीवरील परिस्थिती मांडली. शिवसेना आणि भाजपच्या स्थानिक लोकप्रतिनिधींकडून शासकीय कार्यक्रम, बैठका तसेच महायुती सरकारच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विकासकामांच्या भूमिपूजन आणि लोकार्पण कार्यक्रमांमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना अपेक्षित स्थान दिले जात नसल्याची भावना व्यक्त करण्यात आली. महायुतीतील घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसशी कार्यक्रमांबाबत योग्य समन्वय साधला जावा आणि पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना सन्मानाची वागणूक मिळावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार:
बैठकीत व्यक्त झालेल्या नाराजीची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे प्रमुख पदाधिकारी लवकरच पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेणार आहेत. या भेटीत रावेर लोकसभा जिल्ह्यातील स्थानिक पातळीवरील परिस्थिती वरिष्ठ नेत्यांसमोर मांडून महायुतीतील समन्वयाबाबत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
आगामी निवडणुकांची तयारी:
बैठकीत आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या दृष्टीनेही संघटनात्मक तयारीचा आढावा घेण्यात आला. गट आणि गणनिहाय पक्षाची स्थिती, स्थानिक पातळीवरील तयारी आणि संघटन मजबूत करण्याबाबत चर्चा झाली. विविध तालुकाध्यक्षांनी आपापल्या भागातील तयारीची माहिती वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसमोर मांडली.
याशिवाय विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांसारख्या अशासकीय पदांवर पक्षाच्या इच्छुक कार्यकर्त्यांना संधी मिळावी, यासाठी अर्ज मागवून इच्छुकांची यादी तयार करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मांडलेल्या अडचणी व सूचनांवर भाष्य केले. पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी स्थानिक प्रश्नांबाबत प्रदेश पातळीवर पाठपुरावा करण्याचे त्यांनी सांगितले. बैठकीला माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, ज्येष्ठ नेते भगतसिंग पाटील यांच्यासह रावेर लोकसभा जिल्ह्यातील विविध तालुक्यांचे पदाधिकारी, नगरसेवक, महिला व युवक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









