---Advertisement---
जळगाव, दि. १२ मार्च — रावेर तालुक्यातील गारखेडा येथील आरोग्य उपकेंद्रात घडलेल्या प्रसूती प्रकरणाची जिल्हा परिषद प्रशासनाने गंभीर दखल घेत कंत्राटी आरोग्य सेविकेवर कारवाई केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी गारखेडा आरोग्य उपकेंद्रातील कंत्राटी आरोग्य सेविका (ANM) नंदा कडू पाटील यांना सेवेतून कमी करण्याचे आदेश दिले आहेत.
१० मार्च रोजी मध्यरात्री सुमारे १ वाजेच्या सुमारास रुकसान अजित तडवी या तिसऱ्या खेपाच्या गरोदर महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर आशा सेविकेने तिला तातडीने गारखेडा येथील उपकेंद्रात दाखल केले. याबाबत संबंधित कंत्राटी आरोग्य सेविकेला दूरध्वनीद्वारे कळविण्यात आले होते. मात्र त्या मुख्यालयी राहत नसल्याने वेळेत उपकेंद्रात पोहोचू शकल्या नाहीत.
दरम्यान, प्रसूती वेदना तीव्र झाल्याने आणि आरोग्य सेविका येण्याआधीच प्रसूतीची वेळ आल्याने तेथे उपस्थित असलेल्या आशा सेविकेने प्रशिक्षणाच्या आधारे उपलब्ध वैद्यकीय साधनसामग्रीचा वापर करून मध्यरात्री सुमारे १ वाजता प्रसूती प्रक्रिया पार पाडली. संबंधित आशा सेविकेने ANM प्रशिक्षण घेतलेले असल्याने प्रसूती सुरक्षितरित्या पार पडली.
मात्र प्रसूतीनंतर नवजात बाळ रडत नसल्याचे लक्षात आल्यानंतर आई व बाळाला पुढील उपचारासाठी पाल ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी सावदा येथे नेत असताना दुर्दैवाने रस्त्यातच नवजात बाळाचा मृत्यू झाला.
या घटनेची जिल्हा परिषद प्रशासनाने गंभीर दखल घेत सखोल चौकशी सुरू केली आहे. प्रथमदर्शनी चौकशीत संबंधित कंत्राटी आरोग्य सेविका मुख्यालयी राहत नसल्याची बाब समोर आल्याने त्यांच्यावर सेवेतून कमी करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम व तत्पर राहण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे.









