---Advertisement---
जळगाव शहरातून जाणाऱ्या मुंबई-नागपूर महामार्गाच्या कामावरून जळगावात मध्यरात्री चांगलाच गोंधळ पाहायला मिळाला. मानराज पार्क चौफुलीवर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाच्या दर्जावर आक्षेप घेत सत्ताधारी गटातील नगरसेवकांनीच काम थांबवलं. नगरसेवक अमर जैन आणि नरेंद्र पाटील यांनी घटनास्थळी ठिय्या देत कामाला विरोध केला.
मानराज पार्क चौफुली हा शहरातील अत्यंत वर्दळीचा परिसर आहे. या ठिकाणी रस्त्याचं काम सुरू असताना वाहनचालकांसाठी पर्यायी मार्गाची योग्य व्यवस्था करण्यात आलेली नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. त्यातच सुरू असलेल्या कामाचा दर्जाही समाधानकारक नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. या कारणांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याचा दावा करत नगरसेवकांनी रस्त्याचं काम थांबवलं.
घटनास्थळी परिस्थिती अधिक चिघळू नये यासाठी उपमहापौर मनोज चौधरी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी संबंधित ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनाही बोलावण्यात आलं. नगरसेवक आणि उपमहापौरांनी महामार्गाच्या कामाबाबत अधिकाऱ्यांकडे नाराजी व्यक्त केली. नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करून काम सुरू ठेवण्याला विरोध करण्यात आला.
यावेळी नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघात होत असल्याचा दावा करत, नागरिकांचे जीव जात असताना प्रशासन आणखी किती बळी जाण्याची वाट पाहत आहे, असा सवाल नगरसेवक आणि उपमहापौरांनी उपस्थित केला. रस्त्याच्या कामाचा दर्जा, वाहतुकीची व्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत पुढील निर्णय घेण्यासाठी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत मुंबई-नागपूर महामार्गाच्या कामाबाबत तसेच मानराज पार्क चौफुलीवरील वाहतूक आणि सुरक्षेच्या प्रश्नावर काय निर्णय होतो, याकडे आता जळगावकरांचे लक्ष लागले आहे.









