---Advertisement---
नाशिक/एरंडोल : एरंडोल तालुक्यातील एका कुटुंबातील भाविकांच्या कारला झालेल्या भीषण अपघातात ७२ वर्षीय वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला असून दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. ही दुर्घटना नाशिक जिल्ह्यातील म्हसरूळ परिसरात घडली असून, घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल येथील सूर्यवंशी कुटुंबीय सप्तशृंगी गडावर देवीचे दर्शन घेऊन त्र्यंबकेश्वरकडे जात होते. शनिवारी सकाळच्या सुमारास म्हसरूळजवळ त्यांच्या कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन धडकली. अपघात इतका भीषण होता की कारच्या पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला.
या भीषण अपघातात कमळाबाई रामदास सूर्यवंशी (वय ७२) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर उषा धुमाळकर आणि शोभाबाई धोंडू सूर्यवंशी या दोन महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारमधील इतर प्रवाशांनाही किरकोळ दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.
अपघाताची माहिती मिळताच म्हसरूळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून, या प्रकरणी अपघाताची नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.
या दुर्घटनेमुळे एरंडोल परिसरात शोककळा पसरली असून, भाविकांवर काळाने घाला घातल्याची भावना व्यक्त केली जात आहे.









