---Advertisement---
महाराष्ट्र विधान परिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाच्या चर्चांना वेग आला असून 3-1-1 असा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, पुणे शिक्षक मतदारसंघाच्या जागेवरून भाजप आणि शिवसेना यांच्यात अद्याप मतभेद असल्याचे वृत्त आहे.
चार जागांबाबत चित्र स्पष्ट?
चर्चेत असलेल्या फॉर्म्युल्यानुसार छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), अमरावती शिक्षक मतदारसंघ शिवसेना (शिंदे गट) आणि नागपूर तसेच पुणे पदवीधर मतदारसंघ भाजप लढवणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या जागावाटपाबाबत अंतिम अधिकृत घोषणा झालेली नाही.
पुणे शिक्षक जागेवरून पेच
पुणे शिक्षक मतदारसंघावर भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांकडून दावा केला जात असल्याने महायुतीसमोर या जागेचा पेच निर्माण झाला आहे. शिवसेना (शिंदे गट) या जागेसाठी आग्रही असून मंगेश चिवटे यांचे नाव इच्छुकांमध्ये चर्चेत आहे. महायुतीकडून उमेदवारी न मिळाल्यास चिवटे यांना अन्य आघाडीकडून उमेदवारी देण्याची घोषणा राजर्षी शाहू विकास आघाडीचे आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केली आहे.
दरम्यान, पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवारीबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या चर्चेनंतर होणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितले आहे.
२३ ऑक्टोबरला मतदान
विधान परिषदेच्या पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर पदवीधर तसेच पुणे आणि अमरावती शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणूक होत आहे. २९ सप्टेंबरला अधिसूचना जारी झाली असून ६ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. ७ ऑक्टोबरला छाननी, ९ ऑक्टोबरला अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असून २३ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. मतमोजणी २७ ऑक्टोबरला होईल.
उमेदवारांची उत्सुकता वाढली
महायुतीतील जागावाटपाचा अंतिम निर्णय आणि त्यानंतर उमेदवारांची नावे जाहीर होण्याकडे आता पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील इच्छुकांचे लक्ष लागले आहे. विशेषतः पुणे शिक्षक मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जातो, यावर महायुतीतील पुढील राजकीय समीकरण स्पष्ट होणार आहे.









