---Advertisement---
आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मधील भारत-पाकिस्तान अंतिम सामना अखेर भारताच्या नावावर झाला. कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पाकिस्तानचा १९ धावांनी पराभव करत सुवर्णपदक पटकावले. भारताने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ६ बाद २११ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ निर्धारित षटकांत लक्ष्यापासून १९ धावा दूर राहिला.
अभिषेकचा तडाखा, तिलकची नाबाद अर्धशतकी खेळी
नाणेफेक जिंकून श्रेयस अय्यरने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. वैभव सूर्यवंशीने ९ चेंडूत १५ धावा करत आक्रमक सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र मोठा फटका खेळताना त्याला विकेट गमवावी लागली.
यानंतर अभिषेक शर्माने पाकिस्तानच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला. त्याने अवघ्या २८ चेंडूत ६१ धावांची तुफानी खेळी केली. या खेळीत ७ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. संजू सॅमसन २ धावांवर, तर श्रेयस अय्यर २१ धावांवर बाद झाला. इशान किशनने २० धावांचे योगदान दिले.
डावाच्या अखेरच्या टप्प्यात तिलक वर्मा आणि शिवम दुबे यांनी धावांचा वेग वाढवला. शिवमने १५ चेंडूत २७ धावा केल्या. तर तिलक वर्माने अवघ्या २२ चेंडूत नाबाद ५१ धावा करत भारताला २०० पार नेले. त्यामुळे भारताने पाकिस्तानसमोर २१२ धावांचे आव्हान ठेवले.
हसन नवाझची झुंज व्यर्थ
लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानला सुरुवातीलाच धक्के बसले. साहिबजादा फरहान १०, माझ सदाकत २३ आणि उस्मान खान केवळ ३ धावांवर माघारी परतले. सॅम अय्युबने २९ धावांची खेळी केली, तर अब्दुल समदला ९ धावांवर समाधान मानावे लागले.
मात्र हसन नवाझने एक बाजू लावून धरत भारताच्या गोलंदाजांचा सामना केला. त्याने ५१ चेंडूत ९६ धावांची आक्रमक खेळी केली. त्याच्या खेळीत ५ चौकार आणि ७ षटकार होते. मात्र इतर फलंदाजांकडून अपेक्षित साथ न मिळाल्याने हसनची झुंज अपुरी ठरली.
भारताकडून अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. अखेर पाकिस्तानचा संघ लक्ष्यापासून १९ धावा दूर राहिला आणि भारताने अंतिम सामन्यात विजय मिळवत सुवर्णपदक आपल्या नावे केले. पाकिस्तानला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.









