---Advertisement---
जळगाव : महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील १७ रिक्त जागांसाठी निवडणुकीचे बिगुल वाजताच जळगावच्या राजकीय वर्तुळात प्रचंड घडामोडी सुरू झाल्या आहेत. जळगाव स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा महायुतीत शिवसेनेला (शिंदे गट) सुटावी आणि या जागेवर माझा मुलगा प्रतापराव पाटील याला उमेदवारी मिळावी, अशी उघड आणि थेट मागणी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे. त्यांच्या या विधानामुळे महायुतीत जळगावच्या जागेवरून रस्सीखेच सुरू झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
भाजपचाही दावा, पण शिवसेनेचा इतिहास मजबूत : गुलाबराव पाटील
जळगाव विधान परिषदेच्या जागेवर भाजपने आधीच आपला दावा ठोकला आहे. यावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, “वरिष्ठ पातळीवर जागांमध्ये फेरबदल झाले, तर जळगावची जागा शिवसेनेसाठी सोडावी ही आमची हक्काची मागणी आहे. आतापर्यंत आम्ही भाजपला खांद्याला खांदा लावून प्रामाणिकपणे काम केले आहे. विशेष म्हणजे, भूतकाळात शिवसेनेने दोन वेळा ही जागा लढवून ती जिंकूनही दाखवली आहे. नंतरच्या काळात ती भाजपकडे गेली. त्यामुळे यंदा ही जागा पुन्हा आमच्या पदरात पडावी.”
’वरिष्ठांचा निर्णय अंतिम’
“मुलगा प्रतापराव पाटील याच्या उमेदवारीसाठी मी इच्छा नक्कीच व्यक्त केली आहे. मात्र, महायुतीचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील, मग तो भाजपसाठी असो की शिवसेनेसाठी, तो आम्हाला महायुती म्हणून पूर्णपणे मान्य असेल. मी पक्षाची बंधने पाळणारा माणूस आहे.”
— गुलाबराव पाटील, मंत्री
‘किशोर पाटलांच्या मुलाचे वय २८, आमदार असून कसं माहीत नाही?’: गुलाबराव पाटलांचा टोला
पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील हे देखील आपल्या मुलासाठी विधान परिषदेच्या तिकिटासाठी मोर्चेबांधणी करत असल्याच्या चर्चेवर पत्रकारांनी विचारले असता, गुलाबराव पाटलांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले.
”त्यांचा मुलगा काय अन् माझा मुलगा काय, पण विधान परिषदेची निवडणूक लढवण्यासाठी वय ३० वर्षे पूर्ण असावे लागते. किशोर पाटलांच्या मुलाचे वय सध्या २८ वर्षे आहे. किशोर भाऊ स्वतः आमदार आहेत, त्यांना या तांत्रिक गोष्टी नक्कीच माहीत असायला हव्यात,” असा टोला गुलाबरावांनी लगावला. पुढे हसत ते म्हणाले, “किशोर पाटलांचा मुलगा नात्याने शेवटी माझा नातूच लागतो!”
’ऑपरेशन टायगर’वर सूचक मौन!
ठाकरे गटाच्या खासदारांना पक्षात आणण्याच्या कथित ‘ऑपरेशन टायगर’बद्दल विचारले असता, गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त केला. “शेवटी ते एकनाथ शिंदे साहेब आहेत! ते कधी काय गेम करतील, याबद्दल आधीच कोणीच काही सांगू शकत नाही,” असे म्हणत त्यांनी या विषयावर गूढ सस्पेन्स कायम ठेवला.
थोडक्यात काय तर…
जळगाव स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवरून महायुतीत आता अंतर्गत चढाओढ सुरू झाली असून, गुलाबराव पाटलांनी थेट पुत्रासाठी शड्डू ठोकल्यामुळे भाजप आता काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.









