---Advertisement---
जळगाव: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सर्वाधिक तांत्रिक 167 पदावरील एनएचएम अंतर्गत कंत्राटी नर्सेस, शहरी ग्रामीण एएनएम जीएनएम, एलएचव्ही, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व एनयुएचएम अंतर्गत कार्यरत तसेच एनएचएम कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांना रिक्त पदावर समायोजन करण्याबाबत तसेच बजेट अधिवेशनात लोकप्रतिनिधींना दिलेले आश्वास पुर्ण न केल्यामुळे या संघटनांनी आज 25 ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
15 वर्षापासून तुटपुंज्या मानधनावर खेडोपाडी व शहरात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी आरोग्य सेविका, सहाय्यीका प्रयोग शाळा तंत्रज्ञ, औषधी निर्माण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आरोग्य सेवा देत आहेत. आपल्या कुटुंबाची पर्वा न करता देवदूतासारखे कोविड महामारीवर मात करण्यासाठी रात्रदिवस आरोग्य सेवा दिलेली आहे. याबाबत आरोग्य मंत्री यांच्या कक्षात बैठकही झाली. त्यात समायोजन करण्याकरिता लवकरच कार्यवाही करण्यात येईल. तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन वाढ बाबत निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते.
विधानसभेत उत्तर मग कार्यवाही कधी?
ओडीसा, पंजाब, राजस्थान, मणिपूर तसेच महाराष्ट्रातील विविध विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत शासन निर्णय देण्यात आले होते. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील विधानसभा व विधानपरीषद सदस्यांनी तसेच इतर लोकप्रतिनिधी शासनास निवेदन सादर करुन या कंत्राटी कर्मचान्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे राज्यातील रिक्त जागेवर समायोजन करण्याची विनंती केलेली होती. विधान सभेच्या बजेट क्षेत्रात सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर शासनाचे उत्तर म्हणून 31 मार्च 2023 पर्यंत समायोजन करण्यात येईल असे सांगितले होते. परंतु तसे केलेले नसल्याने हे सर्व कर्मचारी आजपासून बेमुदत काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. दरम्यान कामबंद आंदोलनाचे निवेदन मनपा प्रशासक डॉ. विद्या गायकवाड यांना देण्यात आले. यावेळी संघटनेच्या मंगला दायमा, शिवानी परदेशी, सतीश तडवी, सुमन सरताळे, सिमा परदेशी, दिपाली बोरनारे यांच्यासह 40 कर्मचारी उपस्थित होते.