भुसावळात ‘जनसमाधान बैठक’ उत्साहात; जिल्हाधिकाऱ्यांनी ऐकल्या नागरिकांच्या तक्रारी, तत्काळ कार्यवाहीचे निर्देश….

---Advertisement---

 

नागरिकांच्या दैनंदिन समस्या, तक्रारी आणि विविध शासकीय कामांचे स्थानिक स्तरावर जलद व पारदर्शक निवारण व्हावे, या उद्देशाने जळगाव जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येणारी ‘जनसमाधान बैठक’ गुरुवारी भुसावळ येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेत संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

शासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे नागरिकांना छोट्या-छोट्या प्रशासकीय कामांसाठी जिल्हा मुख्यालयात वारंवार फेऱ्या मारण्याची गरज कमी होत आहे. प्रत्येक गुरुवारी संबंधित उपविभागीय कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या अर्जांवर सुनावणी घेतली जात असून, त्यांचे तातडीने निवारण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

बैठकीत महसूल, ग्रामविकास, पोलीस, आरोग्य, सामाजिक न्याय, पाणीपुरवठा, वीज, नगरपरिषद, कृषी, शिक्षण आदी विभागांशी संबंधित विविध तक्रारी व मागण्यांवर चर्चा करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांना अर्जांची पडताळणी करून निश्चित कालमर्यादेत निवारण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तक्रार निवारण प्रक्रियेला डिजिटल स्वरूप देण्यात आले आहे. बैठकीत प्राप्त होणाऱ्या प्रत्येक अर्जाची तत्काळ नोंद *’जनसमाधान पोर्टल’*वर करण्यात येत असून, प्रत्येक अर्जाला स्वतंत्र क्यूआर कोड दिला जात आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या अर्जाची सद्यस्थिती, संबंधित विभागाकडील कार्यवाही आणि अंतिम निर्णयाची माहिती ऑनलाइन पाहता येणार आहे.

जिल्हा प्रशासनाच्या या लोकाभिमुख उपक्रमामुळे तक्रार निवारण प्रक्रियेत पारदर्शकता, जबाबदारी आणि गती वाढण्यास मदत होत असून, नागरिकांनाही शासकीय सेवांचा अधिक प्रभावी लाभ मिळत आहे. हा उपक्रम नियमितपणे सर्व उपविभागांमध्ये राबविण्यात येणार असून नागरिकांनी त्याचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---