हवेत गोळीबार प्रकरणी कोळन्हावीच्या सरपंचाची न्यायालयीन कोठडीत रवानगी….

---Advertisement---

 

डांभुर्णी गावातील चौकात गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या कोळन्हावीच्या सरपंचाला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर आरोपीला सोमवारी यावल न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर त्याची रवानगी भुसावळ येथील उपजिल्हा कारागृहात करण्यात आली.

कोळन्हावी, ता. यावल येथील सरपंच विकास उर्फ गोटू जगन्नाथ सोळंके (३७) यांच्यावर डांभुर्णी येथील चौकात हवेत गोळीबार करून दहशत निर्माण केल्याचा आरोप आहे. ही घटना २७ ऑगस्ट रोजी रात्री घडली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, सोळंके यांच्या हॉटेलमध्ये अवैध देशी दारूची विक्री होत असल्याचा व्हिडिओ काढण्यात आल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला होता. याच रागातून डांभुर्णी येथील बिर्याणीच्या दुकानाजवळ त्यांनी गावठी बनावटीच्या पिस्तुलातून हवेत गोळीबार केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर पोलिसांनी कारवाई करत विकास उर्फ गोटू सोळंके यांच्यासह रोशन भीमराव सपकाळे, रा. भुसावळ, यांना अटक केली होती. पोलिस हवालदार हितेश बागुल यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध आर्म्स अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटकेनंतर सोळंके यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली होती. पोलिस कोठडीची मुदत पूर्ण झाल्यानंतर त्यांना सोमवारी यावल न्यायालयात हजर करण्यात आले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. एस. जगताप यांनी त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालयाच्या आदेशानंतर विकास उर्फ गोटू सोळंके यांची रवानगी भुसावळ येथील उपजिल्हा कारागृहात करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मैनोद्दीन सैय्यद करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---