‘लाडकी बहीण योजना बंद होऊ शकते’; उज्ज्वला योजनेच्या सबसिडी सिलेंडरची संख्या आता 9 वरून 4 वर, रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ…!

---Advertisement---

 

महाराष्ट्र राज्यात पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील सबसिडी एलपीजी सिलेंडरच्या संख्येत कपात झाली असून सबसिडी सिलेंडरची संख्या आता 9 वरून 4 वर करण्यात आली आणि यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका करत ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ही भविष्यात बंद होऊ शकते, असा दावा केला आहे. आणि त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अनुदानित अर्थात सबसिडीच्या सिलेंडरची वार्षिक मर्यादा यापूर्वी १२ वरून ९ करण्यात आली होती. दरम्यान आता ती आणखी कमी करून ४ करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करत आमदार रोहित पवार यांनी सरकारच्या या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) केलेल्या पोस्टमध्ये रोहित पवार म्हणाले की, “उज्ज्वला योजनेतील अनुदानित गॅस सिलेंडरची संख्या आधी १२ वरून ९ आणि आता ९ वरून थेट ४ करण्यात आली आहे. उद्या ही योजनाच बंद केली तरी आश्चर्य वाटणार नाही.”

याचबरोबर त्यांनी राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’बाबतही चिंता व्यक्त केली. निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणावर लाभ देण्यात आल्यानंतर आता विविध निकषांच्या आधारे लाखो महिलांना योजनेबाहेर काढले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

“आज लाडकी बहीण योजनेतून ८० लाख महिलांना योजनेतून अपात्र ठरवून वगळण्यात आले आहे. उद्या आणखी नवीन निकष लावून लाभार्थ्यांची संख्या आणखी कमी केली जाऊ शकते किंवा योजना बंदही केली जाऊ शकते,” असा दावा त्यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे.

सरकारने मतांसाठी योजना जाहीर करून नंतर त्यामध्ये बदल केला असा आरोप त्यांनी केला. “निवडणुकीत मतांची बेगमी करण्यासाठी योजना आणल्या जातात आणि नंतर त्यामध्ये कपात केली जाते. पुढील निवडणुकीत पुन्हा एखाद्या नव्या योजनेचे गाजर दाखवले जाईल,” अशी टीका रोहित पवार यांनी केली.

आमदार रोहित पवार यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून या आरोपांवर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---