दिवाळीपूर्वी लळिंग घाट उजळला; १०५ खांबांवर २२० दिव्यांची रोषणाई; वाहनचालकांना दिलासा….

---Advertisement---

 

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील लळिंग घाट आता विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिवाळीच्या पूर्वसंध्येला घाटात १०५ पथदिव्यांचे खांब उभारून त्यावर तब्बल २२० विद्युत दिवे बसवले आहेत. यामुळे रात्रीच्या वेळी घाटातील प्रवास अधिक प्रकाशमान झाला असून वाहनचालकांकडून या कामाचे स्वागत केले जात आहे.

मुंबई-आग्रा महामार्गाच्या निर्मितीपासून लळिंग घाटात छोटे-मोठे अपघात तसेच चोरी आणि लूटमारीच्या घटना घडत असल्याने हा परिसर चर्चेत राहिला आहे. या घटनांना आळा घालण्यासाठी यापूर्वी पोलिस प्रशासनाकडून घाटात पोलिस चौकीही उभारण्यात आली होती. येथे चोवीस तास पोलिस कर्मचारी तैनात असायचे. मात्र, मागील अनेक वर्षांपासून ही चौकी बंद असल्याचे सांगितले जाते. महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यानंतर अपघातांचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले. तरीही अधूनमधून अपघात, चोरी आणि लूटमारीच्या घटना घडत असल्याने रात्रीच्या प्रवासादरम्यान वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण होते.

लळिंग घाटाच्या दोन्ही बाजूंना लळिंग कुरणाचे जंगल क्षेत्र असल्याने लूटमार करणाऱ्या टोळ्यांना घटनांनंतर जंगलाच्या दिशेने पळ काढणे सोपे जात असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे घाटातील सुरक्षिततेचा प्रश्न सातत्याने उपस्थित होत होता. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घाटात १०५ पथदिव्यांचे खांब उभारून २२० विद्युत दिवे बसवले आहेत. दिवाळीपूर्वी करण्यात आलेल्या या कामामुळे संपूर्ण घाट परिसर रात्रीच्या वेळी प्रकाशमान झाला आहे.

पथदिव्यांमुळे रात्री वाहन चालवताना दृश्यमानता वाढण्यास मदत होणार आहे. तसेच अपघात आणि लूटमारीसारख्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठीही ही व्यवस्था उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा वाहनचालक व्यक्त करीत आहेत. घाटातील अंधार दूर झाल्याने वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे. या रोषणाईमुळे लळिंग घाटातून रात्रीचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या या कामाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---