---Advertisement---
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घटनात्मक पदावरील २५ वर्षांच्या कार्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. यासोबतच शासकीय मालकीच्या काही भूखंडांच्या वितरण धोरणात सुधारणा आणि शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानाच्या यात्रास्थळ विकासासाठी बांधकामाला मंजुरी देण्यात आली.
पंतप्रधान मोदींच्या अभिनंदनाचा ठराव
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनात्मक पदावर राहून २५ वर्षे जनसेवा केल्याबद्दल मंत्रिमंडळाने एकमताने अभिनंदनाचा ठराव मंजूर केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा ठराव मांडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि मंत्रिमंडळातील अन्य सदस्यांनी या ठरावाचे स्वागत केले.
शासकीय भूखंडांच्या धोरणात बदल
शासकीय मालकीचे काही छोटे, चिंचोळे किंवा स्वतंत्र बांधकामासाठी अयोग्य असलेले भूखंड विकसित करण्याच्या दृष्टीने त्यांच्या वितरण धोरणात सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. पोहोच मार्ग नसलेले किंवा उपयुक्त आकार नसल्याने विकासासाठी अडचणीचे ठरणारे भूखंडही या धोरणाच्या कक्षेत येणार आहेत.
यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे) नियम, १९७१ मधील नियम ३७ आणि ३७-अ मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. या बदलांमुळे अशा भूखंडांच्या व्यवस्थापन आणि वितरणाबाबत अधिक सुसंगत प्रक्रिया राबवता येणार आहे.
शेगावच्या यात्रास्थळ विकासाला मंजुरी
बुलढाणा जिल्ह्यातील गिरडा येथे श्री संत गजानन महाराज संस्थानाच्या यात्रास्थळ विकासासाठी कायमस्वरूपी बांधकाम करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यापूर्वी वृक्षलागवडीसाठी संस्थानाला देण्यात आलेल्या १९ हेक्टर ६ आर जमिनीपैकी ३ हेक्टर ८१ आर क्षेत्रावर बांधकाम करता येणार आहे.
या निर्णयामुळे यात्रास्थळी येणाऱ्या भाविकांसाठी आवश्यक सुविधा उभारण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे परिसरातील यात्रास्थळाचा विकास आणि भाविकांच्या सोयीसुविधांमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.









