---Advertisement---
धुळे जिल्ह्यातील बाळापूर येथे स्मार्ट मीटर बसवण्याचे काम करणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा शहरात त्याची पुनरावृत्ती झाली. मारहाणीत रक्तदाब प्रचंड वाढल्याने कर्मचाऱ्यास थेट आयसीयूमध्ये दाखल करावे लागल्याची गंभीर घटना शनिवारी घडली. याप्रकरणी रात्री उशिरा दोन भावांवर आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
महावितरणच्या लालबाग शाखेचे कनिष्ठ कार्यालयीन सहायक राजेंद्र वाघ व वरिष्ठ तंत्रज्ञ वासुदेव मालचे हे 5 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास गल्ली नं. 5, जे.बी. रोड कॉर्नर, जिनगर गल्लीजवळील अजिंक्य हॅण्डलूम या दुकानात स्मार्ट मीटर बसविण्यासाठी गेले होते. त्यांच्यासोबत एनसीसी या स्मार्ट मीटर एजन्सीचे यशवंत दुसाने व नीलेश ठाकूर हे कर्मचारी होते. या ठिकाणी अशोक खंडू वाणी (पिंगळे) या नावाने वीजजोडणी आहे. तेथे जुने मीटर काढून नवीन स्मार्ट मीटर लावण्याचे काम सुरू होते. यशवंत दुसाने हे मीटर काढत होते. त्यांच्याजवळ राजेंद्र वाघ उभे होते. त्यावेळी मोटारसायकलवर संतोष अशोक पिंगळे व अमोल अशोक पिंगळे आले. अमोलने वाघ यांना शिवीगाळ करत ‘तुम्ही मीटर कसे व कोणाला विचारून बदलत आहात’ असे विचारले. त्यावर वाघ म्हणाले की, ‘संतोष यानेच बिल नीट येत नसल्याची तक्रार दिली होती. त्यावेळीच सूचना दिली होती की जुने मीटर बदलावे लागणार आहे. आता मीटर बदलण्याच्या यादीत तुमचे नाव आलेले आहे. त्यामुळे मीटर बदलत आहे. मीटर बदलायचे नसेल तर तुम्ही साहेबांशी बोलून घ्या’. त्यावर अमोल पिंगळेने वाघ यांच्या कानफटात मारले. शासकीय कामात अडथळा आणू नका असे वाघ यांनी सांगताच संतोष पिंगळेने वाघ यांच्या हातातील मोबाइल हिसकावत आमचे फोटो काढता का, असे विचारले.
वाघ हे दोघांनाही समजावत असताना अमोल त्याच्या भावाला म्हणाला की, ‘ते लाकूड आण रे, याच्या डोक्यात टाकतो. कसे मीटर बदलतो बघतोच’, अशी जिवे मारण्याची धमकी दिली. संतोषने वाघ यांच्या खांद्याला जोराचा धक्का दिला. घटना समजताच वाघ यांचे कार्यालयीन सहकारी गोळा झाले. वाघ यांना चक्कर येत होती. तरीही आरोपींची शिवीगाळ व दादागिरी सुरूच होती. वाघ हे सहकाऱ्यांसह आझादनगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास गेले. त्या ठिकाणी अमोल पिंगळेही आला. वाघ हे नाटक करत असल्याचा आरोप त्याने केला. ‘माझे राजकीय पुढारी ओळखीचे आहेत. तुला घरात घुसून मारेल’, अशी धमकी अमोल पिंगळेने दिली. आरोपींच्या मारहाणीत वाघ यांच्या मानेला, डोक्याला तसेच कानास डाव्या बाजूला इजा झाली. मारहाणीच्या धक्क्याने वाघ यांचा रक्तदाब इतका वाढला की त्यांना शासकीय रुग्णालयाच्या अतीव दक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलिसांनी रुग्णालयात जाऊन वाघ यांचा जबाब नोंदवला. त्यावरून आरोपी संतोष अशोक पिंगळे व अमोल अशोक पिंगळे यांच्यावर आझादनगर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या सहा कलमांन्वये शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.









