---Advertisement---
शेतीच्या वादातून चुलत मामावर कुऱ्हाडीने हल्ला करून त्याचा जीव घेतल्याप्रकरणी आरोपी भाच्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. शहादा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने कुमजी देवजी पाडवी याला जन्मठेपेसह 11 हजार रुपयांचा दंड ठोठावला.या प्रकरणातील मयताचे नाव खुमा बामण्या वळवी (वय 35) असून आरोपी कुमजी पाडवी हा त्यांचा चुलत भाचा आहे. खुमा वळवी, त्यांचे भाऊ सोन्या वळवी आणि कुमजी पाडवी यांच्यामध्ये शेतीवरून वाद सुरू असल्याचे तपासात समोर आले.
पोलिसांच्या तपासानुसार, कुमजी पाडवी हा खुमा आणि सोन्या वळवी या दोघांना जीवे मारण्याची धमकी देत होता. 10 मार्च 2019 रोजी सायंकाळी तो कथितरित्या दारूच्या नशेत त्यांच्या घराजवळ कुऱ्हाड घेऊन आला. शेतीच्या वादावरून त्याने दोन्ही भावांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. परिस्थिती शांत करण्यासाठी खुमा आणि सोन्या त्याच्याजवळ गेले असता वाद आणखी वाढला. यावेळी कुमजीने हातातील कुऱ्हाडीने खुमा वळवी यांच्या मानेवर वार केल्याचे अभियोग पक्षाने न्यायालयात मांडले. कुऱ्हाडीच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने खुमा वळवी जमिनीवर कोसळले. त्यानंतर आरोपीने कुऱ्हाड बाजूला फेकून सोन्या वळवी यांच्या डोक्यावर दगडाने हल्ला केल्याचा आरोप आहे. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. मात्र गंभीर जखमी खुमा वळवी यांचा मृत्यू झाला.
घटनेनंतर मोलगी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी कुमजी देवजी पाडवी याला अटक करून तपास पूर्ण केला आणि दोषारोपपत्र शहादा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले. खटल्यादरम्यान सादर करण्यात आलेले पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अ. वि. गुजराथी यांनी सबळ पुराव्यांच्या आधारे कुमजी देवजी पाडवी याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याचबरोबर 11 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला.
या प्रकरणाचा तपास मोलगी पोलीस ठाण्याचे निरीक्षक पंडित सोनवणे यांनी केला. सरकार पक्षातर्फे ॲड. स्वर्णसिंह गिरासे यांनी काम पाहिले. तर पोलीस पैरवी अधिकारी उपनिरीक्षक योगिता राठोड यांच्यासह सागर गाडीलोहार, गोकुळ बंजारा, सचिन परदेशी, देविदास सूर्यवंशी आणि शैलेंद्र जाधव यांनी न्यायालयीन कामकाजात सहकार्य केले.









