---Advertisement---
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अध्यक्षपदाबाबत महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. विद्यमान अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत रजेवर राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार आयोगाचे सदस्य सतीश वाघोळे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. या निर्णयामुळे आयोगाच्या प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी आता वाघोळे सांभाळणार आहेत.
एमपीएससीच्या परीक्षांमधील अनियमिततेच्या मुद्द्यावरून पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. या आंदोलनात अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर भीमनवार यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत पदापासून दूर राहण्याचा निर्णय जाहीर केला.
सतीश वाघोळेंकडे अतिरिक्त कार्यभार
अध्यक्षपद रिक्त झाल्याने आयोगाचे कामकाज कोण पाहणार, याबाबत उत्सुकता होती. त्यानंतर राज्य सरकारने एमपीएससीचे सदस्य सतीश वाघोळे यांचे नाव प्रभारी अध्यक्षपदासाठी प्रस्तावित केले. आता त्यांच्याकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
पेपरफुटीच्या आरोपांनंतर प्रशासकीय फेरबदल
एमपीएससीच्या परीक्षांशी संबंधित अनियमितता आणि पेपरफुटीच्या आरोपांमुळे आयोगाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. याच प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आयोगाचे तत्कालीन सचिव महेंद्र हरपाळकर यांना पदावरून कार्यमुक्त करण्यात आल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, एमपीएससीच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार मुंबई उपनगरीय जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. त्यामुळे आयोगाच्या वरिष्ठ प्रशासकीय स्तरावरही बदल झाले आहेत.
एमपीएससीच्या परीक्षांबाबत पारदर्शकता राखणे आणि विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा मिळवणे, हे आयोगासमोरील महत्त्वाचे आव्हान ठरणार आहे. या प्रकरणातील चौकशी आणि पुढील प्रशासकीय निर्णयांकडे आता स्पर्धा परीक्षार्थींचे लक्ष लागले आहे.









