---Advertisement---
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) सचिव महेंद्र हरपाळकर यांची सचिवपदावरील प्रतिनियुक्ती राज्य सरकारने संपुष्टात आणली आहे. याबाबत २ ऑक्टोबर रोजी सामान्य प्रशासन विभागाकडून शासन आदेश जारी करण्यात आला. हरपाळकर यांनी MPSC अध्यक्षांच्या संमतीने आपला कार्यभार तत्काळ अन्य अधिकाऱ्याकडे सोपवावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यांच्या पुढील पदस्थापनेबाबत स्वतंत्र आदेश काढला जाणार आहे.
विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत झाली होती बैठक
MPSCच्या परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरप्रकार, पेपरफुटी आणि इतर मागण्यांवरून विद्यार्थी आंदोलन करत होते. या पार्श्वभूमीवर ३० सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेतली होती. या बैठकीत सचिवांची बदली करण्याबाबत आश्वासन देण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यानंतर सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला.
पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा आक्षेप
औषध निरीक्षक परीक्षेतील कथित पेपरफुटी तसेच MPSCच्या परीक्षा प्रक्रियेतील त्रुटींवरून विद्यार्थ्यांनी आयोगाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले होते. सचिव आणि अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणीही काही विद्यार्थी संघटनांकडून करण्यात आली होती. या प्रकरणांमध्ये तपास आणि चौकशीची प्रक्रिया सुरू आहे.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सरकारकडून प्रतिसाद
सचिवांच्या बदलीसोबत MPSCच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेणे, भरती प्रक्रियेसंदर्भात नियोजन करणे आणि आयोगाच्या कारभाराची चौकशी यांसह विविध मुद्द्यांवर सरकारने निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. या आश्वासनांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी २ ऑक्टोबर रोजीचे प्रस्तावित आंदोलन स्थगित केले होते.









