वीजचोरीविरोधात महावितरणची धडक कारवाई; खेडी खुर्दमध्ये १२ अँपिअर, तुरखेड्यात ४५ एच.पी. अनधिकृत भार कमी….

---Advertisement---

 

वीजचोरी आणि अनधिकृत वीजवापराला आळा घालण्यासाठी महावितरणने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत खेडी खुर्द आणि तुरखेडा गाव शिवारात शेतीपंपांसाठी अनधिकृतपणे टाकण्यात आलेले वीज आकडे काढून टाकण्यात आले. या कारवाईत खेडी खुर्द येथे १२ अँपिअर, तर तुरखेडा शिवारात ४५ एच.पी. इतका अनधिकृत वीजभार कमी करण्यात आला.

कार्यकारी अभियंता दत्तात्रय साळी आणि उपकार्यकारी अभियंता विजय कापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली खेडी खुर्द येथे ही मोहीम राबविण्यात आली. कानळदा कक्षाचे कनिष्ठ अभियंता इम्तियाज अली यांनी पथकासह वीजचोरीसाठी वापरण्यात येणारे अनधिकृत वीज आकडे शोधून काढले. या कारवाईमुळे वीज वितरण यंत्रणेवरील १२ अँपिअरचा अतिरिक्त भार कमी झाला.

तुरखेडा गाव शिवारातही महावितरणने कारवाई केली. कनिष्ठ अभियंता दिनेश पाटील यांनी विदगाव गावठाण वीजवाहिनीवरून शेतीपंपांसाठी घेण्यात आलेल्या अनधिकृत वीजजोडण्यांविरोधात मोहीम राबविली. यावेळी अनधिकृत वीज आकडे काढून टाकण्यात आले. परिणामी, तब्बल ४५ एच.पी. इतका अनधिकृत वीजभार कमी करण्यात महावितरणला यश आले.

अनधिकृत वीजजोडण्यांमुळे वितरण यंत्रणेवर अतिरिक्त ताण निर्माण होतो. त्याचबरोबर तांत्रिक आणि व्यावसायिक वीजहानी वाढण्याची शक्यता असते. अशा जोडण्यांवर कारवाई केल्याने वीजहानी रोखण्यास आणि वीज वितरण यंत्रणेची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यास मदत होते. तसेच नियमित वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांना दर्जेदार आणि सुरळीत वीजपुरवठा मिळण्यास हातभार लागतो.

वीजचोरी आणि अनधिकृत वीजवापर रोखण्यासाठी ही विशेष मोहीम यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. वीज वितरण यंत्रणेचा सुरक्षित आणि अधिकृत पद्धतीने वापर करावा, असे आवाहनही ग्राहकांना करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---