---Advertisement---
नंदुरबार शहरातील करण चौफुली परिसरात गुजरात राज्यात विक्रीसाठी नेली जात असलेली देशी व विदेशी दारू जप्त करण्यात नंदुरबार शहर पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत सुमारे ९२ हजार ९४४ रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांना करण चौफुली परिसरातून देशी-विदेशी दारूची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. पंचांच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या छापेमारीदरम्यान दोन संशयित दारूची वाहतूक करताना आढळून आले.
पोलिसांनी तपासणी केली असता त्यांच्या ताब्यातून ९२ हजार ९४४ रुपये किमतीची देशी व विदेशी दारू जप्त करण्यात आली. प्राथमिक तपासात हा मद्यसाठा गुजरात राज्यात विक्रीसाठी नेला जात असल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 716/2026 दाखल करण्यात आला असून महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(ई) अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
या प्रकरणात आयुष राजेश तिळंगे (वय 24, रा. कंजरवाडा, नंदुरबार) आणि लखन कन्हैयाल बघत्यापुरी (वय 38, रा. सिंधी कॉलनी, नंदुरबार) यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वंजारी तसेच प्रदीप बाविस्कर, राकेश मोरे, सलीम शेख, जितेंद्र रायपुरे आणि देवीदास दाभाडे यांच्या पथकाने केली.









