मुलांच्या शिक्षणासाठी शहरात अभ्यासिका, वसतिगृहाची गरज; ‘तरुण भारत’तर्फे आयोजित चर्चासत्रात नाभिक समाज संघटना प्रतिनिधींमधून उमटला सूर….

---Advertisement---

 

जळगाव : नाभिक समाज बांधव सलुन दुकान चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मुले हुशार असली तरी शिक्षणासाठी मोठा खर्च होतो, तो पेलण्याइतकी आर्थिक क्षमता या समाजाची नाही. त्यामुळे हुशार असुनही शिक्षण घेता येत नसल्याचे चित्र शहरासह जिल्ह्यात या समाजातील तरुण पिढीत दिसुन येते. या मुलांना पुढील शिक्षण सहज घेता येईल,यासाठी अभ्यासिका तसेच वसतिगृह, वाचनालय असे उभारल्यास या मुलांचे भविष्य घडण्याला मोठा हातभार लागेल,असा सूर शहरातील नाभिक समाजातील मान्यवरांकडून उमटला. संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त दैनिक ‘तरुण भारत’तर्फे सोमवारी चर्चासत्राचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी समाजबांधवांनी भावना व्यक्त केल्या. तरुणभारतचे संपादक चंद्रशेखर जोशी यांनी प्रास्ताविक करून सर्वांचे स्वागत केले. या चर्चासत्राला शहरातील नाभिक समाज महामंडळ, संघटना पदाधिकारी, सलुन व्यावसायिक व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपादक चंद्रशेखर जोशी यांनी भूमिका स्पष्ट करताना सांगितले, हिंदुत्वा बरोबरच समाजातील सर्व घटकांचे सर्व समावेशक जीवनमान उंचवावे, ही भूमिका तरुण भारतची असून त्या विचारातून गेल्या 2९ वर्षापासून वाटचाल सुरू आहे. व्यावसायिक नव्हे, वैचारिक आणि समाजमूल्य जोपासण्याचे व्रत त्यात सामाविष्ट आहे. नाभिक समाजबांधवांशी परिचय व्हावा, त्यांच्या समस्या जाणुन घेत ते प्रश्न माध्यमातून मांडुन लोकप्रतिनिधी यांच्या लक्षात आणून देण्याचा प्रामुख्याने ‘तरुण भारत’चा उद्देश आहे. त्यातूनच आजचे चर्चासत्र आयोजित केले,असे संपादक जोशी यांनी सांगितले.

चर्चासत्रात नाभिक समाज संघाचे माजी जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ भिका वखरे, नाभिक समाज विकास मंडळ संस्था अध्यक्ष जगदीश मधुकर वाघ, श्री संत सेना नाभिक हितवर्धक संघाचे सचिव अनिल पंढरीनाथ निकम, संत सेना नाभिक हितवर्धकचे उपाध्यक्ष राजकुमार गोरख महाले, सदस्य अशोक पंडीत वसाने, विकास मंडळ शहर अध्यक्ष उदय भास्कर पवार, सदस्य चंद्रकांत भगवान शिंदे, एमआयडीसीतील भिकन दामुजी बोरसे,विकास मंडळ शहर सचिव विकास प्रल्हाद बोरसे, युवक उपाध्यक्ष विजय राजेंद्र वाघ, महामंडळ जिल्हा कोषाध्यक्ष विलास पंढरी साळुंखे, संत सेना समाज मंडळाचे सहसचिव लहु शामराव राऊत, जिल्हा युवा उपाध्यक्ष मनोज अरुण बिढे, पिंप्राळा नाभिक समाज अध्यक्ष महेश सदाशिव साळवी, जळगाव शहर कार्याध्यक्ष योगेश शिवाजी वाघ, शहर सचिव प्रेमकुमार भगवान डापसे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

समाजात सहकार्य अपेक्षित:

मुलांची क्षमता आहे, मात्र… नाभिक समाज अल्प आहे.मात्र ते आर्थिकदृष्टया ते सक्षम नाहीत. नवी पिढी बऱ्यापैकी शिक्षणात प्रगल्भ होताना दिसत आहे. इंजिनिअर, एमपीएससी करण्याची त्यांची मानसिकता आहे. अनेक तरुणांनी नव तंत्रज्ञान अवगत केले आहे. मात्र उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक भार उचलण्याची त्यांच्या पालकांची परिस्थिती नाही. या तरुणांना त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून वाचनालय, अभ्यासिका भवन अशी सुविधेची अंत्यत आवश्यकता आहे. त्यात पुस्तके असावीत, यासाठी सातत्याने महामंडळ व समाजाच्या संघटनांतून पाठपुरावा केला जात आहे, मात्र अद्याप यश मिळाले नाही,अशी खंत समाजबांधवांनी व्यक्त केली.

योजनेचा लाभ मिळावा:

आजही जिल्ह्यात ग्रामीण भागात नाभिक समाज कुटुंब उदरनिर्वाह इतका पैसा कमवित आहे. मुलांनी शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभे राहावे,अशी आई वडिलांची अपेक्षा असते, समाजात अनेक मुले हुरहुन्नरी व हुशार आहेत. अशा हुशार मुलांच्या शिक्षणासाठी त्यांच्याकडे पैसा राहत नाही, ही वस्तूस्थिती आहे. सरकारच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत. समाजातील सुशिक्षत तरुणांच्या शिक्षणासाठी त्याचा लाभ कसा घेता येईल, यासाठी आमदार, खासदार यांच्या माध्यमातून जाणीवपूर्वक प्रयत्न होण्याची गरज आहे, अशी आग्रही भूमिका समाजबांधवांनी या चर्चासत्रात सहभाग घेताना मांडली.

समाज एकवटला, तरी निराशाच:

समाजातील मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात. त्याबरोबरच त्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी महामंडळाच्या माध्यमातून नागपूर नाशिक तसेच आझाद मैदानावर नाभिक समाजबांधवांनी धडक दिली. आश्वासनाशिवाय काही मिळाले नाही, असे सांगत समाजबांधवांनी मुलांचे भवितव्यासाठी आता तरी लोकप्रतिनिधी यांनी पुढाकार घेऊन शासनाकडे पाठपुरावा करावा,अशी मागणी केली. नाभिक समाजासाठी आर्थिक महामंडळ तयार करण्यात आले. त्याला शासनाकडून अर्थसहाय्य उपलब्ध करुन द्यावे, ही पण अनेक वर्षापासूनची मागणी आहे, मात्र अजुनही ही मागणी दुर्लक्षित असल्याचे समाज बांधवांनी सांगितले.

कारागिराला पेंशन मिळावे:

सलुन दुकानात केशकर्तनालय काम करणाऱ्या कारागिरांना पेशंन योजना लागु करण्याची गरज आहे. वयाच्या 45 ते 50 वर्षापर्यत हे कारागिर चांगल्या पध्दतीने काम करु शकतात. नंतर काय? हा प्रश्न त्यांना भेडसावतोय. पुढे कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा? या काळजीने ते खचताहेत. पुढील आयुष्य जगण्यासाठी त्यांना पेंशन लागू करण्याची अंत्यत आवश्यकता आहे, असे विविध मान्यवरांनी मत मांडताना सांगितले. वसतीगृह, अभ्यासिका सभागृहासाठी वास्तू उभी राहावी. जळगाव जिल्ह्यातील समाज बांधवांना सोयीची आणि उपयुक्त अशा ठिकाणी शहरात कोठेही ते उभे राहावे, हुतात्मा स्मारकाला नावे द्यावीत, असाही यावेळी सुर उमटला.

नाभिक समाजासाठी तरुण भारतने चर्चासत्र घडविले. याचर्चासत्रात मनमोकळे पणे समाजाच्या व्यथा मांडता आल्या. याबद्दल दैनिक तरुण भारतचे सर्व समाज बांधवांनी आभार मानत या उपक्रामाचे कौतुक केले. जाहिरात प्रतिनिधी मनोज भांडारकर यांनी नाभिक समाज बांधवाचे आभार मानले. सहकार्यासाठी पाठपुरावा केला जाईल असे ते म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---