रस्ता नाही, वाहन नाही; प्रसूतीकळांत गर्भवतीची सात किलोमीटरची पायपीट

---Advertisement---

 

गणेशोत्सवाच्या उत्साहात सर्वत्र बाप्पाच्या स्वागताची तयारी सुरू असताना सातपुड्यातील दुर्गम भागातील आरोग्य सुविधांची विदारक परिस्थिती पुन्हा समोर आली आहे. अक्कलकुवा तालुक्यातील बारीपाडा येथील एका गरोदर महिलेला प्रसूतीकळा सुरू झाल्यानंतर रुग्णवाहिका किंवा वाहनाअभावी चक्क बांबूच्या झोळीतून सुमारे सात किलोमीटरचा प्रवास करावा लागला.

फुलांती देवराम पाडवी यांना शनिवारी मध्यरात्री प्रसूतीकळा सुरू झाल्या. मात्र बारीपाडा परिसरातून वेहगीपर्यंत जाण्यासाठी योग्य रस्ता नसल्याने कुटुंबीयांसमोर मोठे संकट उभे राहिले. अखेर नातेवाइकांनी बांबूच्या साहाय्याने झोळी तयार केली आणि महिलेला त्यातून घेऊन प्रवास सुरू केला.

काळोखात नदी ओलांडत प्रवास

रात्रीच्या अंधारात बॅटरीच्या उजेडाचा आधार घेत नातेवाइकांनी सुकी नदीचा प्रवाह पार केला. प्रसूतीकळा सहन करत असलेल्या महिलेला झोळीत घेऊन पायपीट करत वेहगी गावातील मुख्य रस्त्यापर्यंत आणण्यात आले.

त्यानंतर खासगी वाहनाची व्यवस्था करून महिलेला पिंपळखुटा आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे उपचारानंतर तिने सकाळी एका बाळाला जन्म दिला.

बाळाला जन्म दिल्यानंतरही झोळीचीच साथ

आरोग्य केंद्रातून दुपारी सुट्टी मिळाल्यानंतरही अडचण संपली नाही. वेहगीपर्यंत वाहनाने आल्यानंतर बारीपाड्यापर्यंत पुन्हा रस्त्याअभावी बांबूच्या झोळीचा आधार घ्यावा लागला. नवजात बाळासह नातेवाइकांनी महिलेला झोळीतूनच घरी नेले.

‘बांबूलन्स’ कधी थांबणार?

सातपुड्यातील दुर्गम भागात रुग्णांसाठी झोळीच रुग्णवाहिकेचा पर्याय बनल्याचे चित्र वारंवार समोर येते. काही दिवसांपूर्वी आजारी महिलेचा झोळीतून नेत असताना मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच गरोदर मातेला पुन्हा अशीच कसरत करावी लागली.

आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता, नदीवरील पूल आणि नियमित वाहतुकीची सुविधा उपलब्ध नसल्याने बारीपाड्यासह परिसरातील नागरिकांची गैरसोय कायम आहे. त्यामुळे गणरायाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर दुर्गम भागातील रुग्णांचा हा ‘झोळीप्रवास’ अखेर कधी संपणार? असा सवाल उपस्थित होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---