---Advertisement---
वरणगाव येथे वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे एका जखमी व्यक्तीला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना वरणगाव येथे घडली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आणि रुग्णालयातील असुविधांच्या विरोधात आज वरणगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांनी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक सचिन अहिरे यांना घेराव घालत जाब विचारला.
वरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून,काल झालेल्या मोटारसायकल अपघातात 108 रुग्णवाहिका तसेच NHAI ची रुग्णवाहीका सुद्धा तिथे उपलब्ध नसल्याने वेळेत न मिळाल्याने सतीश बाविस्कर या नागरिकाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप करत आज नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांनी थेट ग्रामीण रुग्णालयावर धडक देत तीव्र ठिय्या आंदोलन छेडले. आज सकाळी 8 वाजल्यापासून ग्रामीण रुग्णालय परिसरात वातावरण तापले होते. नगराध्यक्ष सुनील काळे,उपनगराध्यक्ष अरुणाताई इंगळे यांच्यासह नगरसेवकांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन अहिरे यांना घेराव घालत रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले.रुग्णांना वेळेवर उपचार नाहीत,डॉक्टर उपलब्ध नाहीत, कर्मचाऱ्यांची कमतरता आहे आणि रुग्णवाहिका सेवाही कोलमडली आहे, असा संतप्त आरोप आंदोलकांनी केला.
अपघातग्रस्त सतीश बाविस्कर यांना तातडीने पुढील उपचारासाठी हलविण्याची गरज असताना 108 रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध झाली नाही.या हलगर्जीपणामुळेच त्यांचा जीव गेल्याचा आरोप करत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
ग्रामीण रुग्णालय म्हणजे केवळ नावापुरती सेवा उरली आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असून आरोग्य विभाग झोपेत आहे,अशी घणाघाती प्रतिक्रिया नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दिली.आंदोलनादरम्यान रुग्णालय प्रशासन आणि नगरपरिषद पदाधिकाऱ्यांमध्ये काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.वाढत्या संतापामुळे परिसरात मोठी गर्दी झाली होती









