ऑनलाइन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; उझबेकिस्तानसह पाच महिलांची सुटका, मुख्य आरोपी अटकेत, अन्य आरोपींचा शोध सुरू…..

---Advertisement---

 

नागपूर शहरात ऑनलाइन माध्यमातून चालवल्या जात असल्याचा संशय असलेल्या आंतरराष्ट्रीय देहव्यापार रॅकेटचा गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून उझबेकिस्तानसह देशातील विविध राज्यांतील पाच महिलांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

पोलिसांना ऑनलाइन ऍपच्या माध्यमातून ग्राहकांना महिलांची व्यवस्था करून दिली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाने गुप्त तपास सुरू केला. तपासादरम्यान एका हॉटेलमध्ये सापळा रचून पोलिसांनी छापा टाकला. कारवाईदरम्यान एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले.

त्यानंतर पोलिसांनी शहरातील आणखी दोन ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत एकूण पाच महिलांची सुटका करण्यात आली. त्यामध्ये उझबेकिस्तानमधील दोन महिला तसेच दिल्ली, पंजाब आणि कोलकाता येथील प्रत्येकी एका महिलेचा समावेश असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.

प्राथमिक तपासानुसार, आरोपी ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ग्राहकांशी संपर्क साधत होते. महिलांना जास्त उत्पन्नाचे आमिष दाखवून या अवैध व्यवसायात सहभागी केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या रॅकेटमधील आर्थिक व्यवहार आणि नेटवर्कचा तपासही सुरू आहे. कारवाईदरम्यान पोलिसांनी मोबाईल फोन, एक कार आणि रोख रक्कम असा सुमारे ५.१८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी अंबाझरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून समीर उर्फ मनीष उर्फ गगन ठाकूर, राहुल आणि पूजा या संशयितांसह इतर फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. सुटका करण्यात आलेल्या महिलांना आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संबंधित यंत्रणांच्या मदतीने संरक्षण आणि पुनर्वसनासाठी पाठविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---