---Advertisement---
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि SIR प्रक्रियेविरोधात कॉक्रोच जनता पार्टी (CJP)चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आंदोलन सुरू आहे. २ ऑक्टोबर रोजी शिवाजी पार्क येथे आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती. पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती, तरीही CJPकडून आंदोलन करण्याची भूमिका घेण्यात आली.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर CJPच्या भूमिकेला विरोध करणारे जेन नेक्स्टचे कार्यकर्तेही रस्त्यावर उतरले. मंत्रालय परिसरात त्यांच्या आंदोलनाला सुरुवात झाली. त्यामुळे मुंबईत एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या भूमिकांची आंदोलने पाहायला मिळाली.
CJPच्या काय आहेत मागण्या?
SIR प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित करत CJPकडून मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच SIR प्रक्रिया रद्द करावी आणि २०२९ची निवडणूक २०२५च्या मतदार यादीच्या आधारे घ्यावी, अशा मागण्या CJPने मांडल्या आहेत.
अभिजीत दिपके यांनी आंदोलन पुढेही सुरू ठेवण्याची भूमिका व्यक्त केली आहे. ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा न दिल्यास ऑक्टोबरच्या अखेरीस दिल्लीतील जंतर-मंतर येथे पुन्हा आंदोलन करण्याचे त्यांनी सांगितले आहे.
‘CJPच्या आंदोलनाला विरोध करणार’
दरम्यान, जेन नेक्स्टच्या आंदोलकांनी CJPच्या आंदोलनाला विरोध दर्शवला. CJPकडून राजकारण केले जात असल्याचा आरोप करत आपण संविधान मानणारे नागरिक असल्याचे त्यांनी म्हटले. CJPच्या आंदोलनाच्या भूमिकेला विरोध करण्यासाठीच रस्त्यावर उतरल्याचे आंदोलकांनी सांगितले.
दरम्यान, आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला असून परिस्थितीवर प्रशासनाचे लक्ष आहे. CJPच्या आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती यापूर्वी समोर आली होती.









