नशिराबाद नगरपरिषदेच्या अवयवदान जनजागृती रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद; ‘अवयव दान करा… जीवन वाचवा’चा संदेश…

---Advertisement---

 

महात्मा गांधी जयंती तसेच माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त नशिराबाद नगरपरिषदेच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत ‘अवयव दान करा… जीवन वाचवा’ या संदेशाचा प्रसार करण्यासाठी अवयवदान जनजागृती अभियान राबविण्यात आले. यानिमित्त नगरपरिषद कार्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शहरातून मोटारसायकल रॅली काढून नागरिकांमध्ये अवयवदानाबाबत जनजागृती करण्यात आली.
अवयवदानाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीत नगरपरिषदेचे पदाधिकारी, नगरसेवक-नगरसेविका, अधिकारी-कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले. ‘अवयव दान करा… जीवन वाचवा’ या संदेशाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला. या अभियानात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत अवयवदानाबाबत जनजागृती करण्यास सहकार्य केले. अवयवदानाबाबत समाजात असलेले गैरसमज दूर करून त्याचे महत्त्व अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

कार्यक्रमास नशिराबाद नगरपरिषदेचे प्रभारी नगराध्यक्ष पंकज महाजन, मुख्याधिकारी रविंद्र सोनवणे, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष व नगरसेवक लालचंद दादा पाटील, नगरपरिषद सभापती व नगरसेवक कीर्तीकांत चोबे, प्रदीप बोढरे, वासिफ सर, लीना महाजन, जनाबाई रंधे, सुवर्णा महाजन, भारती धनगर, तसेच महावितरण कक्षाचे सहाय्यक अभियंता पवन वाघुळदे उपस्थित होते.
यावेळी नगरपरिषदेचे सर्व सन्माननीय नगरसेवक व नगरसेविका, अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता, सेवा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत अवयवदानासारख्या जीवनदायी उपक्रमाबाबत जनजागृती करण्यात आली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---