---Advertisement---
कायद्याचा धाक निर्माण करणाऱ्या पोलिसांमध्येच वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याची घटना धरणगाव पोलीस ठाण्यात समोर आली आहे. ड्युटीच्या नियोजनावरून दोन पोलीस अंमलदारांमध्ये वाद होऊन त्याचे पर्यवसान हाणामारीत झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, याच प्रकरणात एका अंमलदाराने पोलीस निरीक्षकांच्या दालनात जाऊन त्यांच्याशीही वाद घातल्याचे सांगितले जात आहे. घटनेनंतर एका अंमलदाराची पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे पाच दिवसांपूर्वी सायंकाळच्या सुमारास धरणगाव पोलीस ठाण्यात दोन अंमलदारांमध्ये ड्युटीच्या नियोजनावरून वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक स्वरूपात असलेल्या या वादाचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून इतर सहकाऱ्यांनी मध्यस्थी करत दोघांमधील वाद मिटविला.
या घटनेनंतर एका अंमलदाराने पोलीस निरीक्षकांच्या दालनात जाऊन त्यांच्याशी वाद घातल्याची आणि दमदाटी केल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस ठाण्याच्या परिसरातच घडलेल्या या प्रकारामुळे पोलीस दलातील शिस्तीचा प्रश्न चर्चेत आला आहे.
या वादामागे ड्युटीचे नियोजन हे कारण सांगितले जात असले, तरी पोलीस दलात अवैध धंद्यांशी संबंधित आर्थिक हितसंबंधांचीही चर्चा असल्याचे वृत्त आहे. मात्र, या चर्चेला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे वादाचे नेमके कारण काय, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
या घटनेनंतर एका पोलीस अंमलदाराची पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. मात्र, दुसऱ्या अंमलदारावर कोणती कारवाई करण्यात आली, याबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकारी काय भूमिका घेतात आणि संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी होते का, याकडे लक्ष लागले आहे. धरणगाव पोलीस ठाण्यात घडलेल्या या प्रकारामुळे पोलीस दलातील अंतर्गत शिस्त आणि कारवाईतील समानतेचा मुद्दा चर्चेत आला आहे.









