शेतकऱ्यांना रात्रीऐवजी दिवसा वीज द्या; सर्पदंशाने शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर पंचक्रोशीतील शेतकरी आक्रमक….

---Advertisement---

 

साक्री तालुक्यातील घोडदे परिसरातील शेतकऱ्यांना कृषीपंपांसाठी रात्रीच्या वेळेऐवजी दिवसा वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी केली आहे. रात्रीच्या वेळी शेतात पाणी देण्यासाठी जाताना साप, विंचू आणि वन्यप्राण्यांचा धोका निर्माण होत असल्याने शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

घोडदे येथील ज्ञानेश्वर सुरेश क्षीरसागर (वय ४३) हे २४ सप्टेंबर रोजी रात्री शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना विषारी सापाने दंश केला. त्यांच्यावर उपचार सुरू होते; मात्र उपचारादरम्यान २६ सप्टेंबर रोजी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांनी रात्रीच्या कृषी वीजपुरवठ्याच्या वेळेबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

सध्या परिसरातील शेतकऱ्यांना कृषीपंपांसाठी रात्री १२ ते सकाळी ८ वाजेपर्यंत वीजपुरवठा केला जात आहे. त्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना मध्यरात्रीच्या वेळी शेतात जावे लागते. अंधारात शेतात काम करताना साप, विंचू तसेच वन्यप्राण्यांचा धोका असतो. त्यामुळे रात्रीच्या वीजपुरवठ्याऐवजी दिवसा वीज उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

घोडदे, सुरपान, आमोडे, किरवाडे, ढोलीपाडा यासह परिसरातील शेतकऱ्यांनी सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत कृषीपंपांसाठी वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे. याबाबत महावितरणच्या साक्री उपविभागाच्या उपकार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून वीजपुरवठ्याची वेळ बदलावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

वीजपुरवठ्याची वेळ बदलण्याची मागणी मान्य न झाल्यास संबंधित कार्यालयासमोर आंदोलन तसेच रास्ता रोको करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. यावेळी अमोल क्षीरसागर, डी. एल. पाटील, संभाजी पाटील, हंसराज पाटील, कांतीलाल पवार, संजय गांगुर्डे, दिनेश क्षीरसागर, सुरेश पाटील, शशिकांत क्षीरसागर, अमित सोनवणे, योगेंद्र सोनवणे, राजेंद्र जिरे, अनिल निकम, कल्पेश क्षीरसागर, संजय क्षीरसागर, अशोक चव्हाण, दीपक निकम यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---