दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये अनुदान द्या; हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी

---Advertisement---

 

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर आणि बोदवड तालुक्यांतील दुष्काळग्रस्त भागांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत विदारक असल्याचे सांगत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. शेतकऱ्यांना हेक्टरी सरसकट एक लाख रुपयांचे अनुदान द्यावे, संपूर्ण कर्जमाफी करावी आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सपकाळ यांनी केली.

दुष्काळामुळे शेतकरी हतबल झाला असून, त्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. एकाही शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये, यासाठी सरकारने गांभीर्याने पावले उचलावीत, असे आवाहनही त्यांनी केले.

कुंभमेळा आणि शक्तिपीठाच्या निधीतून शेतकऱ्यांना मदत करा

कुंभमेळ्यासाठी प्रस्तावित ३६ हजार कोटी रुपये आणि शक्तिपीठ महामार्गासाठीच्या ८० हजार कोटी रुपयांच्या निधीतून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी सपकाळ यांनी केली. सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

बावनकुळे यांच्या वक्तव्यावर टीका

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अवैध सावकारी रोखण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सपकाळ यांनी त्यांच्यावर टीका केली. बावनकुळे जळगाव दौऱ्यावर येऊन खोटे बोलून गेल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपशी संबंधित लोकच सावकारी करत असल्याचा दावा करत, सरकारकडून शेतकऱ्यांना पुरेशी मदत मिळत नसल्याचेही ते म्हणाले.

शेतकरी हताश झाला असून, त्यांना वेळेत मदत मिळाली नाही आणि आत्महत्यांसारख्या घटना घडल्या, तर त्याची जबाबदारी सरकारने स्वीकारली पाहिजे, अशी भूमिका सपकाळ यांनी मांडली.

गिरीश महाजन यांच्यावरही निशाणा

कुंभमेळ्याच्या कामांवरून बोलताना सपकाळ यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर टीका केली. कुंभमेळ्याशी संबंधित कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, अशा प्रकरणांवरून प्रश्न उपस्थित होत असताना संबंधित नेत्यांच्या वक्तव्यांवर विश्वास कसा ठेवायचा, असा सवाल त्यांनी केला.

दिल्लीतील आंदोलनावरून केंद्र सरकारवर टीका

दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सपकाळ यांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधला. राजधानीत मोठ्या प्रमाणावर निर्बंध लावून नागरिकांना सत्याग्रह करण्यापासून रोखले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. रेल्वे आणि मेट्रो सेवांवरील निर्बंधांचा उल्लेख करत, देशात हुकूमशाहीसदृश परिस्थिती निर्माण होत असल्याची टीका त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा

पुण्यात सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर बोलताना सपकाळ यांनी आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची आणि ७० हजार पदांची भरती तातडीने करण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त असल्याचे सांगत, मुख्यमंत्री आपल्या कथित भ्रष्ट मित्राला वाचवण्यासाठी आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

शेतकरी आत्महत्यांवरून सरकारला प्रश्न

शेतकरी आत्महत्यांच्या मुद्द्यावर बोलताना सपकाळ यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली. भांडवलशाहीला प्रोत्साहन देताना शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी घेतल्याप्रमाणे धाडसी निर्णय नरेंद्र मोदी घेऊन शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढणार का, असा सवालही सपकाळ यांनी उपस्थित केला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---