अमळनेरच्या अमरधामातील व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह; अर्धवट जळालेल्या मृतदेहांच्या विटंबनेची चर्चा, पालिकेकडून चौकशीचे आश्वासन…!

---Advertisement---

 

अमळनेर शहरातील अमरधाम स्मशानभूमीतील कथित गैरव्यवस्थेबाबत शहरात मोठी चर्चा सुरू झाली असून अर्धवट जळालेल्या मृतदेहांची भटक्या कुत्र्यांकडून विटंबना होत असल्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहेत. मात्र या घटनेबाबत अद्याप अधिकृतरीत्या पुष्टी झालेली नसून नगरपरिषद प्रशासनाने संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.

अमळनेर शहरातील स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अमरधामात अंत्यसंस्कारासाठी आवश्यक प्रमाणात गोवऱ्या व सरण उपलब्ध होत नसल्याने काहीवेळा अंत्यविधी पूर्णत्वास जात नसल्याची तक्रार आहे. तसेच स्मशानभूमीत कायमस्वरूपी कर्मचारी नसल्यामुळे दुःखाच्या प्रसंगी मृतांच्या नातेवाईकांनाच सरण रचण्यापासून अंत्यविधीपर्यंतची अनेक कामे करावी लागत असल्याचे सांगितले जात आहे.

यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण असून स्मशानभूमीसारख्या संवेदनशील ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरत आहे. काही नागरिकांनी अर्धवट जळालेल्या मृतदेहांबाबत गंभीर आरोप केले असले तरी या दाव्यांची सत्यता अद्याप तपासाअंती स्पष्ट होणार आहे.

या संदर्भात संपर्क साधला असता नानाशेठ गौरीवाले यांनी संबंधित प्रकार पूर्वी घडल्याचे सांगितले, मात्र तो अलीकडील नसल्याचा दावा केला. यामुळे प्रकरणाबाबत विविध दावे-प्रतिदावे समोर येत आहेत.

घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांनी अमरधाम परिसराची पाहणी करून चौकशी केली. “अशा प्रकारची अधिकृत तक्रार प्राप्त झालेली नाही. तथापि, सोशल मीडियावरील व्हिडिओ आणि चर्चांची संपूर्ण चौकशी केली जाईल. दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध आवश्यक ती कारवाई करण्यात येईल,” असे त्यांनी सांगितले.

तातडीने उपाययोजना सुरू, मुख्याधिकारी गणेश शिंदे

मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी सांगितले की, अमरधामच्या मुख्य प्रवेशद्वाराचे बांधकाम सुरू असून ठेकेदारास तात्पुरते पत्र्याचे गेट उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच भटके प्राणी परिसरात प्रवेश करू नयेत यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. एका कर्मचाऱ्याची कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात आली असून संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची कार्यवाहीही लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

घटनेची सत्यता तपासाअंती स्पष्ट होणार असली तरी शहरात या प्रकरणाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. स्मशानभूमीतील सुविधांबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात असून नगरपरिषदेच्या कारभारावरही टीका होत आहे. दुसरीकडे, या प्रकारामागे कोणाचा हेतुपुरस्सर हस्तक्षेप आहे का, याबाबतही काही नागरिकांकडून शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन वस्तुस्थिती समोर येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---